कोल्हापूर : ‘शिवरायांचा जयजयकार’, घोडे-उंटासह लवाजमा, मर्दानी खेळ-मल्लखांबांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, पारंपरिक वाद्यांचा गजर, सजीव देखावे व फलकांद्वारे शिवशाहीतील प्रसंगाद्वारे प्रबोधनपर संदेश अशा उत्साही वातावरणात राजारामपुरीमध्ये शुक्रवारी शिवजयंतीची मिरवणूक निघाली. ९० मंडळांतील सुमारे तीन हजार तरुणांनी संयुक्त राजारामपुरी शिवजयंती महोत्सवांतर्गत काढलेल्या मिरवणुकीतून ‘शिवशाही’चा संदेश दिला.राजारामपुरीत यावर्षी पहिल्यांदाच संयुक्तपणे शिवजयंती महोत्सव आयोजित केला होता. त्याअंतर्गत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंचरत्न शाहीर धोंडिराम मगदूम यांचा पोवाडा झाला. त्यानंतर शिवजन्म सोहळा झाला. शिवजयंती मिरवणुकीचे उद्घाटन सायंकाळी साडेपाच वाजता शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, आदी उपस्थित होते. शिवपालखी, छत्रपती शिवरायांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती आणि त्यापुढे घोडे, ऊंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील युवक असा लवाजमासह मिरवणुकीची सुरुवात झाली. त्यात शंभूराजे मर्दानी खेळ मंच आणि शिवशंभू मर्दानी खेळ पथकाने मर्दानी खेळांची, तर अर्जुन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी मल्लखांबांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कोगील बुद्रुक येथील लेझीम पथक आणि मावळ (सावंतवाडी)मधील श्री विठ्ठल तरुण मंडळाच्या ढोलवादन पथकाने मिरवणूक दणाणून सोडली. ‘सोन्याचा नांगर’, रांझ्याच्या पाटलाला शिक्षा’ आदी सजीव देखाव्यांतून शिवशाहीचे दर्शन घडले. धर्मवीर संभाजीराजे यांच्या जीवनावरील सजीव देखावा सादर केला. दहा बैलगाड्यांवर लावलेल्या डिजिटल फलकाद्वारे ‘लेक वाचवा’, ‘अवयव दान, रक्तदान करा’, ‘स्वच्छता राखा’, ‘पाणी वाचवा’, ‘वृक्षसंवर्धनाबाबत प्रबोधन’ केले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ ही मिरवणूक सुरू होती. त्यात पारंपरिक वेशभूषेत महिला, युवतींचा लक्षणीय सहभाग होता. (प्रतिनधी)...अन् तरुणांनी उचलली चारचाकी खरे मंगल कार्यालयाजवळ मिरवणुकीतील डिजीटल वॉल आली. येथून काही अंतरावर रस्त्यात एक चारचाकी पार्किंग केली होती. मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी संबंधित चारचाकी येथून बाजूला काढण्यासाठी त्याच्या चालकाची शोधाशोध केली. मात्र, चारचाकीशी संबंधित कोणी आढळले नाही. अखेर मिरवणुकीतील कार्यकर्ते आणि तरुणांनी अवघ्या काही मिनिटांत ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत चारचाकी उचलून रस्त्यातून बाजूला ठेवली.आचारसंहितेची चौकटया उत्सवासाठी ‘संयुक्त राजारामपुरी’ने आचारसंहिता निश्चित केली होती. उत्सव सुरू झाल्यापासून मिरवणुकीची सांगता होईपर्यंत या आचारसंहितेचे पालन प्रत्येकजण अगदी काटेकोरपणे करत होता. या आचारसंहितेमुळे एक शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गावर व्यसन करत असलेली एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला कार्यकर्ते तेथून बाजूला करत होते.
राजारामपुरीत शिस्तबद्ध मिरवणूक
By admin | Published: April 29, 2017 1:08 AM