कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये पोलिसांना सवलती व रेल्वेमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत शिवशाही बस सेवा सुरू आहे. राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वॉरंट बजावण्याची ड्युटी बजावावी लागते. पण, त्यांना शिवशाही बसमध्ये सवलत मिळत नाही. परिवहन महामंडळातर्फे ही सवलत दिली जाते. पण, ती शिवशाहीला लागू नाही. त्यामुळे पोलीस नेहमीच आरामदायी प्रवासापासून वंचित राहत आहेत.
तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेल्वेचा प्रवासही अनेकदा करावा लागतो. रेल्वेत पोलिसांसाठी आरक्षणाची सोय नाही. त्यांना पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागतो. याचा विचार करून शिवशाही बसमध्ये पोलिसांना सवलत आणि रेल्वे प्रवासात आरक्षण द्यावे, अशी मागणी या शिष्ठमंडळाद्वारे निवेदनातून करण्यात आली.
शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील, योगेश हत्तरगे, दीपक कश्यप, सविता रायकर, तमन्ना शेख, सुरेंद्र माने, प्रमोद पवार, मुमताज बंदुवाडे, विनय पाटील, निवास चव्हाण, संदीप आमने, वैभव पोवार, स्वप्निल खाडे, तानाजी कदम, अमित राणे, आदींचा समावेश होता.