किणी...कोरोनामुळे करवसुली दोन वर्षी झाली नसल्याने ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या असून वीज वितरण कंपनीने वीज बिल भरण्यासाठी सवलत द्यावी, अशा मागणीचे निवेदन वारणा नदीवरील नळपाणी पुरवठा योजना असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या वतीने पेठवडगावचे सहायक अभियंता एस. एस. जगताप यांना देण्यात आले. नंतर त्यांनी जास्त शक्य असेल तेवढे वीज बिल भरणा करा, वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
नळपाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर किणी (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीत किणी, घुणकी, वाठार, भादोले, लाटवडे आदी गावांतील ग्रामपंचायती व विविध पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिक, जनता आधीच त्रस्त असल्याने करवसुली ठप्प झाली असून ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच वीज वितरण कंपनीकडून बिल वसुलीसाठी गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने ग्रामपंचायतीकडून व नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटून किणी येथे एकत्रित बैठक पार पडली. यामध्ये वीज बिलावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी केल्याने थकबाकी वाढली आहे तर काही ग्रामपंचायतींची वसुली नसल्याने थकबाकी वाढली असताना वीज वितरण कंपनीकडून पन्नास टक्के रक्कम भरण्यासाठी सक्ती केली असल्याने एकरकमी वीज बिल भरणे ग्रामपंचायतींना शक्य नसल्याने वीज बिल भरण्यासाठी सवलत मिळावी, अशा मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला .त्यानुसार पेठवडगांवचे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात त्याबाबत शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आल्यानंतर झालेल्या चर्चेनुसार जास्तीत जास्त शक्य असेल तेवढे वीज बिल भरावे. वीज पुरवठा जोडण्याचे आश्वासन सहायक अभियंता जगताप यांनी दिले आहे .
यावेळी लाटवडेचे सरपंच संभाजी पवार, किणीचे उपसरपंच अशोक माळी, सुनील समुद्रे, वारणेचे संचालक सुभाष जाधव, घुणकीचे उपसरपंच रघुनाथ पाटील, प्रताप रासकर, धोंडिराम पाटील (भादोले), संतोष वाठारकर (वाठार), तळसंदेचे सरपंच अमरसिंह पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नळपाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलाच्या पार्श्वभूमीवर किणी (ता. हातकणंगले) येथे बैठक संपन्न झाली. यावेळी संभाजी पवार, धोंडिराम पाटील, अशोक माळीसह विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.