कोल्हापूर : ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांना कर्नाटकमधील सिरसी जिल्ह्यातून खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. या संशोधनामधे झूलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाचे समीर कुमार पती तसेच ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे आणि कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक स्वप्निल पवार यांचा सहभाग आहे.
आरक्त रंग आणि नरांच्या जननेंद्रियांवरुन ही प्रजाती घाटीयाना पोटजातीतील इतर प्रजातींपेक्षा वेगळी ठरते. आरक्त रंगावरुनच त्यांचे नामकरण 'साॅग्युनेलेंटा' या लॅटीन शब्दाने केले आहे. घाटीयाना कुळातील प्रजाती या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधे पसरलेल्या पश्चिम घाटाच्या सदाहरीत जंगलांमधील म्हणून ओळखले जातात. हे खेकडे प्रामुख्याने झाडांच्या ढोलींमधे साठलेल्या पावसाच्या पाण्यामधे आढळून येतात. पावसाळा ऋतु हा त्यांचा सक्रिय असण्याचा काळ आहे. छोटे किटक, शेवाळ हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. या कुळातील नर आणि मादी सारख्याच रंगाचे असतात.
ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन हे सातत्याने दुर्लक्षीत जीवांच्या संशोधनासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असते. 'घाटीयाना साॅग्युनेलेंटा' ही ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी शोधलेली खेकड्याची एकविसावी नवी प्रजाती आहे. 'सह्याद्रीयाना' या खेकड्यांच्या नव्या कुळाचा शोध २०१८ मधे फाउंडेशनच्या संशोधकांनी लावला. सातत्यानं समोर येणार्या खेकड्यांच्या नव्या प्रजातींमुळे या जीवांचे परीसंस्थेतील महत्त्व अधोरेखीत होत आहे.