म्हाकवे : लोकनियुक्त सरपंच सुभाष भोसले यांनी अत्यंत कल्पकतेने वैकुंठभूमी व ग्रामपंचायत इमारतीची उभारणी केली आहे. त्याची जिल्ह्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चाही झाली. त्याच धर्तीवर आता अंगणवाडी इमारतही कमी खर्चात वैशिष्ट्यपूर्ण उभारली आहे.
सरपंच भोसले यांनी आपल्या घरातील दागिने गहाण ठेवून, कर्ज घेऊन तीन टप्प्यांत पाणी योजना साकारली. त्यामुळे गावच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, तसेच गावच्या चारही बाजूच्या पक्क्या रस्त्यांसह सर्वच विकास कामांवर भर दिला. त्यामुळे या गावच्या बदलाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
दरम्यान, डोंगरी विकास कार्यक्रम व जिपच्या स्वनिधीतून मुलांना शाळेची गोडी निर्माण होईल अशी इमारतीची रचना केली आहे. विशेष म्हणजे येथील सर्व कामे पाहून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ अवाक् झाले.
पिराचीवाडी गावाने विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या युवकाला सरपंचपदाची संधी दिली. सुभाष भोसले यांनीही या संधीचे सोने केले. विकासाचे माॅडेल बनलेले हे गाव पाहण्यासाठी परजिल्ह्यातून नागरिक येत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. युवा नेतृत्वांनी भोसले यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा.
-हसन मुश्रीफ
ग्रामविकासमंत्री
कॅप्शन
पिराचीवाडी येथील अंगणवाडीची उभारलेली आकर्षक इमारत
छाया-महादेव फोटो, सावर्डे बुद्रुक