लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी अभिनेते सुशांत शेलार यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उद्या, बुधवारी मुंबईत संचालकांची बैठक होणार असून त्यात अध्यक्षांसह पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत.
मनमानी कामकाज आणि गैरव्यहार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या आरोपावरून दहा दिवसांपूर्वी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर आठ संचालकांनी अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना पदावरून पायउतार केले. सध्या प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर काम पाहत आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे.
अविश्वास ठराव मांडला त्या दिवसापासूनच अध्यक्षपदासाठी सुशांत शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींत धनाजी यमकर, बाळा जाधव यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. ज्येष्ठत्वाचा मान आणि मेघराज राजेभोसले यांच्यासोबत सुरू असलेले शीतयुद्ध याचा विचार केला तर त्यांची अध्यक्षपदावर वर्णी लागू शकते. मेघराज राजेभोसले यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारची बैठक आणि पदाधिकारी निवड महत्त्वाची ठरणार आहे.
---
इंदुमती गणेश