सर्किट बेंचबाबत आज नवी दिल्लीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:16 PM2021-12-22T15:16:59+5:302021-12-22T15:17:42+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी खंडपीठ कृती समितीचे व्यापक शिष्टमंडळ नवी दिल्लीस रवाना झाले.
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी खंडपीठ कृती समितीचे व्यापक शिष्टमंडळ नवी दिल्लीस रवाना झाले. हे शिष्टमंडळ आज, बुधवारी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. प्रदीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, यासाठी शिष्टमंडळ आग्रही भूमिका घेणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, यासाठी गेली ३५ वर्षे लढा सुरू आहे. जिल्हा बार असोसिएशन व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी कायदामंत्री रिजिजू यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मंत्री राणे यांच्या पुढाकाराने केंद्रीय कायदा मंत्र्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आज, बुधवारी बैठक होत असल्याचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, सिंधुदुर्ग येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ व कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले.
या बैठकीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात ॲड. विवेक घाटगे, ॲड. संग्राम देसाई, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे, सेक्रेटरी विजयकुमार ताटे-देशमुख, वसंतराव भोसले (सातारा), संतोष शहा यांचा समावेश आहे.