शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचे संशोधन मौलिक ठरणार आहे. सहा वर्षांचा अभ्यास आणि तीन वर्षांचा प्रत्यक्ष फिल्डवरील अनुभव यामुळे मी संशोधित केलेले जैविक खत चांगले परिणाम दाखवत आहे.
- सुप्रिया कुसाळे, कोल्हापूर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: वळीवडे (ता. करवीर) येथील सुप्रिया कुसाळे या राजाराम महाविद्यालयातील विद्यार्थिनीने जैविक खतावर केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज ऑफ न्यू दिल्लीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत या संशोधनाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पिकांचे उत्पादन, वाढ आणि जमिनीची गुणवत्ता सुधारणाऱ्या जीवाणूच्या संशोधनानिमित्त तिच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न: राष्ट्रीय पातळीवर नावाजले गेलेले हे नेमके संशोधन काय आहे?
उत्तर : मी राजाराम महाविद्यालयात २०१४ पासून इको फ्रेंडली ॲन्ड काॅस्ट इफेक्टीव्ह प्रॉडक्शन ऑफ फायटेज प्रोड्युसिंग बायोईनॉक्लन्ट ॲन्ड इफिशिअन्ही इन फिल्ड या विषयावर पीएच.डी. करत आहे. हे करताना संशोधनाअंती जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश घेऊन त्याचे रुपांतर पिकांच्या वाढीसाठी करण्यात एक जीवाणू महत्त्वाचा असल्याचे आढळले. प्रयोगशाळेत त्याची कृत्रिमपणे वाढ करुन ती प्रत्यक्षात जमिनीत सोडली. त्याचे परिणाम चांगले आल्याने संशोधनाचा व्याप अधिक वाढवला. सध्या बाजारात सेंद्रिय आणि असेंद्रिय खते उपलब्ध आहेत. खासकरुन सेंद्रिय खतांना मागणी वाढली आहे. पण सध्या बाजारात उपलब्ध असलेली बायो फर्टिलायझर्स ही असेंद्रियसाठी उपयुक्त ठरत नाहीत, असे आढळल्याने दोन्हींना एकाच धाग्यात गुंफणारे संशोधन पुढे आणण्यावर भर दिला. यातून जीवाणूचा शोध लावला.
प्रश्न: जीवाणूचे संवर्धन व वापर कसा होतो?
उत्तर : हे जीवाणू द्रव स्वरुपात तयार केले आहे. जमिनीत पुरेशी ओल असताना त्याची आळवणी केल्याने पिकांवर त्याचा चांगला परिणाम दिसला आहे. खासकरुन ऊस, मका, ज्वारी, मिरची, आले, हळद, भात या पिकांच्या उत्पादनामध्ये दहा टक्केपर्यंत वाढ झाल्याचे दिसले आहे. फुलझाडांमध्ये भरपूर फुटवे व फुले येण्यासाठीही हे जीवाणू उपयोगी ठरत आहेत.
प्रश्न : हे जीवाणू नेमके काम कसे करतात?
उत्तर: जमिनीत खते टाकली जातात, पण ती सर्व पिकांना लागू होतातच असे नाही. मृत स्वरुपात असणारे नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस, झिंक यांना परत सक्रिय करुन त्यांचा उपयोग पिकांच्या उत्पादन वाढीसाठी करण्याचे काम हे जीवाणू करतात. ताग, धैंच्या यासारखी हिरवळीची खते व गांडूळ, शेणखताच्या वापरामुळे मुळातच हे जीवाणू जमिनीत तयार होतात. पण अलीकडे ही पारंपरिक खते कमी वापरली जात असल्याने या जीवाणूंचे प्रमाण घटले असून जमिनीची सुपीकताही खालावत चालली आहे. आता नव्याने संशोधन करत हे जीवाणू द्रवस्वरुपात पुन्हा जमिनीत सोडून जमीन पुन्हा एकदा सुपीक बनवता येते.
चौकट ०१
सुप्रिया प्रकाश कुसाळे या शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील शेती करतात. भाऊ एमबीए झाला आहे. आई गृहिणी आहे. घरच्या शेतीच्या अनुभवासह मुलगी नवे संशोधन करत आहे म्हटल्यावर वडील कुसाळे यांनीही ठामपणे पाठीशी उभे राहत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संशोधन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकट ०२
कुसाळे हिने केलेले हे संशोधन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याने आणि पिकांमध्ये त्याची उपयुक्तताही आढळून आल्याने भविष्यात व्यापारी तत्त्वावर त्याचे उत्पादन करण्याचा त्यांचा विचार आहे. शिवाय त्यांनी गेल्यावर्षी याचे पेटंटही मिळवले आहे.
फोटो: २४१२२०२०-कोल-सुप्रीया कुसाळे