सातत्याने दोन वर्षांपासूनचा अभ्यास, वैयक्तिक निरीक्षणे यातून या चिकित्सालयाची संकल्पना प्रत्यक्षास आकारास आली. सामाजिक संबंध ताणले गेल्याने आलेल्या दुराव्यातून अंधकारमय झालेल्या भविष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
प्रा. डॉ. जगन कराडे, संकल्पक व समाजशास्त्र विभागप्रमुख शिवाजी विद्यापीठ
नसिम सनदी-
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने सामाजिक चिकित्सालयाची गेल्या रविवारी स्थापना झाली. सामाजिक संबंधाचा धांडोळा घेणारा, लोकांच्या प्रश्नांना भिडणारा हा देशातील पहिलाच उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आणि अभ्यासातून सुरू होत आहे, ते समाजशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे यांच्याशी यानिमित्ताने संवाद साधला असता, या संकल्पनेचे अनेक पैलू उलगडले.
प्रश्न: सामाजिक चिकित्सालय उपक्रम का सुरू करावा वाटला
उत्तर: समाजात वावरताना सामाजिक संबंधात दुरावा आल्याची, त्यातून ताणतणाव, असुरक्षिता वाढीस लागल्याने त्याचा शरीरावरही परिणाम होत आहे. नैसर्गिक आजारावर डॉक्टर उपचार करु शकतात, पण मानवनिर्मित व्याधींचे काय? असा प्रश्न सतावत होता. समाजाचे सौख्य केवळ सुसंवादाअभावी हरवत चालले आहे, कुठे ताणायचे आणि कुठवर ताणायचे याचे भानच राहिलेले नाही, त्यामुळे ताण सहन न होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे निरीक्षण समाजशास्त्र क्षेत्रात काम करत असताना वारंवार निदर्शनास येत होते. या सर्व निरीक्षणातूनच सामाजिक चिकित्सालय या संकल्पनेचा जन्म झाला. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिल्याने मागील आठवड्यापासून ते शिवाजी विद्यापीठातच सुरू झाले आहे.
प्रश्न : या चिकित्सालयाचे स्वरूप कसे असणार आहे?
उत्तर : विद्यापीठातील मानव्य शास्त्र इमारतीमध्ये समाजशास्त्र विभागातच सकाळी ११ ते ५ या कार्यालयीन वेळेत हे केंद्र चालवले जाणार आहे. येथे समस्या घेऊन येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सात जणांची टीम आहे. शिवाय गरज पडेल तशी ज्या त्या विषयातील तज्ज्ञांचीही मदत मार्गदर्शनासाठी घेतली जाणार आहे. केवळ अडचणी घेऊन आलेल्या व्यक्तिंना कोणत्याही औषधोपचाराशिवाय येथे मार्गदर्शन देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे.
प्रश्न : या अभ्यासाचे डॉक्युमेटेशन होणार आहे काय?
उत्तर : नक्कीच. या केंद्राकडे येणाऱ्या प्रत्येक केसच्या माहितीकडे अभ्यास म्हणून पाहिले जाणार आहे. त्याचे पुस्तक रूपाने डॉक्युमेटेशन करून समाजातील वर्तन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जाणार आहे.
चौकट ०१
विद्यापीठातील संशोधन पुस्तकातच राहते, त्याचा समाजाला उपयोग होत नाही असा वारंवार आरोप होतो, पण आता दृष्टिकोन बदलला आहे. या चिकित्सालयाच्या निमित्ताने समाजशास्त्र विभाग अधिक लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे.
चौकट ०२
दवाखान्यात गेल्यावर ज्याप्रमाणे केसपेपर काढला जातो, त्या धर्तीवर या केंद्रावर अडचणी घेऊन येणाऱ्यांची संपूर्ण माहिती घेतली संवादातूनच जाणून घेतली जाणार आहे. याद्वारे त्याच्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न होणार आहे. लोकान्वय पद्धतीचा वापर करून त्याची साेडवणूक होणार आहे.
चौकट ०३
समाजात योग्य सल्ला देणारे, ऐकून घेणारे, विश्वासाने ज्याच्याकडे मन रिते करावे, अशी माणसी उरली नाहीत. प्रत्येक जण वरवर आनंदी दिसतो, पण संवाद सुरू झाला की पहिल्या पाच मिनिटांनंतर तो आपल्याकडील व्यथांची मांडणी करू लागतो. व्यक्तीमध्ये प्रचंड साचलेपण आले आहे. भावनांचा कोंडमारा होत असल्याने त्या व्यक्त करायच्या तर कुणाकडे असा प्रश्न असतो, आता चिकित्सालय केंद्राच्या रुपाने चांगले
व्यासपीठ तयार झाले आहे. (०२३१ २६०९२३८, ३९) या क्रमांकावर संपर्क साधून अपाईंटमेंट घेता येणार आहे.
फोटो : २००३२०२१-कोल-जगन कराडे