कोल्हापूर : सीपीआरच्या आवारात दुपारच्यावेळी अचानक सहा, सात आलिशान गाड्या येऊन धडकल्या. सगळ्याच गाड्यांचा ११ क्रमांक असल्यामुळे या गाड्या खासदार धैर्यशील माने यांच्या परिवाराच्या असल्याचे लक्षात आले. माने यांच्या परिवारातील ३५ सदस्य या गाड्यांमधून आले आणि वशिला लावून लस घेऊन गेले. मात्र सकाळपासून रांगेमध्ये थांबलेल्या शेकडो नागरिकांनी खासदारांच्या या प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सीपीआरमध्ये लसीकरणासाठी सकाळी आठ वाजल्यापासून रांग लागलेली असते. ज्येष्ठ नागरिक असलेले महिला आणि पुरुष या ठिकाणी कधी एकदा लस मिळेल, याची वाट पाहात असतात. अशावेळी खासदार माने यांच्यासारख्या जबाबदार पदाधिकाऱ्याने लसीकरणासाठी अशापध्दतीने एन्ट्री करणे आणि दुसऱ्या इमारतीमध्ये यंत्रणा लावून लस घेणे अनेकांना पसंत पडले नाही. याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला.
माने यांच्या घरातील ३५ सदस्यांना लस देण्यासाठी जेथे लसीकरण सुरू होते, तेथील तीन नर्सना अन्य इमारतीमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी सर्वांना लस दिल्यानंतर पुन्हा हे सर्वजण गाड्यांचा धुरळा उडवत निघून गेले. माने यांच्या या वशिल्याच्या लसीकरणाची दिवसभर सीपीआर परिसरात चर्चा सुरू होती. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा पध्दतीने सर्वसामान्यांना लस मिळत नसताना, वशिल्याने लस घेऊन सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.