काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा, प्रदेश काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
By राजाराम लोंढे | Published: February 8, 2023 01:09 PM2023-02-08T13:09:27+5:302023-02-08T13:09:55+5:30
ज्यावेळी काँग्रेस हरत होती, त्यावेळी पाटील हे काँग्रेसला विजय मिळवून देत होते
राजाराम लोंढे
कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकांवरून प्रदेश काँग्रेसमधील खदखदीतून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या घडामोडी वेगावल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण, आक्रमक चेहरा म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय मुत्सद्दीपणा व राज्यभर नेतृत्व करण्याची क्षमता व काँग्रेसला जिंकण्याची सवय लावणारा नेता म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये ओळख आहेच, त्याचबरेाबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशाेकराव चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्यांना संधी मिळू शकते.
नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचे बंड, पक्षाच्या ‘एबी’ फॉर्मचा झालेला घोळ त्यातून झालेला खुलासा व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नाराजी पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना बाजूला केले जाण्याची शक्यता काँग्रेस वर्तुळातून वर्तवली जात आहे. अशावेळी राज्यभरातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासह सतेज पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
ज्येष्ठत्वाचा विचार केला तर अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व वडेट्टीवार यांच्यापैकी एक नाव निश्चित होऊ शकते; पण काँग्रेसअंतर्गत गटातटाचे राजकारण पाहिले तर एकमेकांच्या नावाला विरोधही होऊ शकतो. अशा वेळी तरुण व आक्रमक चेहऱ्यावर विचार होऊ शकतो.
असे झाले तर सुनील केदार व सतेज पाटील यांची नावे पुढे येतात. पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक व मुत्सद्दी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दहा पैकी चार आमदार निवडून आणलेच त्याचबरोबर पुणे शिक्षक मतदार संघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी केल्याने त्यांच्या राजकीय मुत्सद्दीगिरीवर शिक्कामोर्तब झाले.
ज्यावेळी काँग्रेस हरत होती, त्यावेळी पाटील हे काँग्रेसला विजय मिळवून देत होते. आगामी दाेन वर्षे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी प्रादेशिक व जातीय समीकरणे पाहता सतेज पाटील यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.
संधी मिळण्याची शक्यता का?
- कोणतीही निवडणूक हातात घेतली की गुलाल घेऊनच मागे येण्याची ताकद
- संघटनकौशल्य व कार्यकर्त्यांचे मोहळ असलेला तगडा नेता
- युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत चांगला समन्वय
- ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध
- आमचं ठरलंय भूमिकेमुळे राज्यभर चर्चा