कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शुक्रवारी (दि. ३०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत वाढीव खर्चावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कालावधीतील तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर खर्चाचे आकडे फुगले आहेत. खर्चावर अंकुश ठेवणार म्हणणाऱ्या संचालकांच्या भत्त्यावरच तब्बल पावणेबारा लाखांचा खर्च झाला आहे. जिल्हा बॅँकेची निवडणूक होऊन मे २०१५ मध्ये संचालक मंडळ कार्यरत झाले. संचालक आले त्यावेळी बॅँकेची अवस्था फारशी चांगली नव्हती, त्यात ठेवींचा ओघ कमी झाल्याने संचालकांसमोर मोठे आव्हान होते. कोणत्याही वित्तीय संस्थेत प्रशासकीय काळातील व संचालकांच्या काळातील कारभारात फरक असतोच; पण जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती, लायसन्सचा निर्माण झालेला प्रश्न व सहा-सात वर्षे लाभांशापासून वंचित असलेले सभासद या सर्व बाबींचा विचार करून संचालकांनी अधिक जबाबदारीने काम करणे अपेक्षित होते. मागील चुका सुधारत काटकसरीचा कारभार करण्याचा निर्धार करत चहाशिवाय बँकेची एकही सेवा न घेण्याची घोषणा संचालकांनी केली. त्यामुळे बॅँकेला गतवैभव प्राप्त होण्यास फार काळ लागणार नाही, असेच वाटत होते. प्रशासकीय कालावधील २०१३-१४, २०१४-१५ व संचालकांच्या कालावधीतील २०१५-१६ या आर्थिक वर्षाची तुलना केली तर कारभाराचे स्पष्ट चित्र समोर येते. इतर खर्चात गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ३२ लाखांची वाढ झाली आहे. टपाल, फोन व तार या खर्चात ४ लाख १६ हजारांची तर संचालक मंडळाच्या भत्त्यावर ११ लाख ६२ हजारांचा खर्च जादा झालेला दिसत आहे. व्याज खर्चातही ३६ कोटी ६५ लाखांची वाढ झाली आहे. तासभर अगोदर व्यक्तिगतांची सभानोकर पगार, भत्त्यात सुमारे दोन कोटींची कपात तर छपाई, सादीलवार, प्रसिद्धी खर्च २३ लाख ६९ हजाराने कमी झाला आहे. ६१ कोटी ६६ लाखाने व्याजातून उत्पन्न वाढले आहे पण विविध कमिशनमधून मिळणाऱ्या उत्पन्नात मात्र २७ लाखांनी घट झाली आहे. ‘एनपीए’ तरतुदीचा उलट जमा-खर्च केल्याने ६ कोटी ४९ लाखाने उत्पन्नात वाढ दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी एक वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथे सभा होत असून तत्पूर्वी तासभर व्यक्तिगत सभासदांची सभा होणार आहे.
वाढीव खर्चावर सभेत होणार चर्चा
By admin | Published: September 29, 2016 12:12 AM