शेतकऱ्यांमध्ये भीती : घनसाळसह पिके अडचणीतआजरा : गेले पंधरा दिवस सुरू असलेला हवामानातील बदलामुळे आजरा तालुक्यातील घनसाळसह, संकरित भात पिकांवर मानेवरील करपा (मानमोड्या) रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असल्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गाकडून या नुकसानीचे शास्त्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे.सध्या तालुक्यातील बहुतांश भागातील भात पिके पोसावली आहेत. मात्र, अशा पोसावलेल्या भात पिकांच्या लोंबावर मानेवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. आजरा, देवर्डे, पोळगाव, श्रृंगारवाडी, चाफवडे, गवसे भागात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या प्रयत्नातून घनसाळ भातक्षेत्र वाढीच्या उद्देशाने चालू साली १५० एकर क्षेत्रांवर घनसाळ लागवडीचा पथदर्शी प्रयोग राबविला आहे. यातील बहुतांश भात पीक या रोगामुळे अडचणीत आले आहे. जादा दिवसांचा कालावधी घेणाऱ्या भाताच्या संकरित जातीही या रोगाला बळी पडत आहेत.केवळ चारच दिवसांत उभे असणारे पीक वाया जात आहे. यामुळे वर्षभराकरिता लागणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या धान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिके पोसावली असतानाच रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने औषध फवारणीचा कालावधीही निघून गेला आहे. जिथे भात पिके अद्याप पोसावलेली नाहीत, तेथे काही अंशी प्रतिबंधात्मक उपाय शक्य आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न पुढे येत आहे. (प्रतिनिधी)शास्त्रज्ञांमार्फत पाहणी व्हावीसध्या भात उत्पादक शेतकरी मानेवरील करपा रोगामुळे अडचणीत आला असून, कृषिक्षेत्रातील शास्त्रज्ञांमार्फत पिकांची पाहणी होऊन नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली.
आजऱ्यात भातावर करपा रोगाचे थैमान
By admin | Published: October 23, 2014 10:17 PM