कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ हे बहुजन समाजाच्या शैक्षणिक वाटचालीतील अस्मिता आणि प्रेरणास्थान आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब देसाई यांच्या पुढाकाराने आणि अनेक मान्यवरांच्या इच्छेने हे विद्यापीठ स्थापन झाले. प्रारंभी कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली कार्यक्षेत्र होते. शिवाय कर्नाटकातील सीमावासीय मराठी बांधवांचे ते शैक्षणिक माहेरच आहे. सोलापुरात स्वतंत्र विद्यापीठ झाले. सुमारे पावणेदोनशे महाविद्यालयांचा कारभार पाहणाऱ्या विद्यापीठात अनेक विद्याशाखांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची सोय झाली. या विद्यापीठाचा २०१२ मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा झाला. तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी या सुवर्ण महोत्सवी समारंभात हजेरी लावताना सुवर्ण महोत्सवी निधी म्हणून विविध नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाला ५० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. दोन वर्षे तशीच गेली. एक पै देखील विद्यापीठास मिळाली नाही. वारंवार विविध प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. विद्यापीठाने ते सादरही केले; पण निधी काही मिळाला नाही.
सत्तांतर झाले. भाजप आघाडीचे सरकार राज्यात आले. विद्यापीठाचा अनुभव तोच राहिला. निधी देणारच, अशी घोषणा मात्र राज्यकर्त्यांच्या झेंड्यांचे रंग बदलले तरी कायम आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. खोटे बोलणार पण रेटून बोलत राहणार, हा बाणा काही त्यांनी सोडलेला नाही. अजितदादा पवार यांचे वारसदार म्हणून ते शोभून दिसतात.आजवर केवळ ५ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी दिला आहे. ४० पैकी उर्वरित ३९ कोटी ४४ लाख रुपये अद्याप द्यायचे आहेत. त्यासाठीचे प्रस्ताव अनेक वेळा दाखल करण्यास सांगण्यात आले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विद्या-पीठाच्या अधिकाºयांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यालाही आता तीन वर्षे झाली. प्रगती शून्यच.दरम्यानच्या काळात विद्यापीठाने स्वनिधीतून काही विभाग सुरू केले. त्यांचा खर्च चालू आहे. या विभागांच्या प्रगतीविषयी सर्वजण गौरवोद्गार काढतात. मध्यंतरी हा उर्वरित सर्व निधी एकदम देता येणे शक्य होणार नाही, म्हणून पाच-दहा कोटी रुपये दरवर्षी याप्रमाणे देण्याचे ठरले. प्रत्यक्षात काही घडलेच नाही. संतापाची बाब ही की, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि पालकांना खोटी आश्वासने देऊन सरकार फसवीत आहे, याचा कोणालाही संताप येताना दिसत नाही. ऊठसूट आंदोलने करणारे, अनेक अस्मितांचे फलक फडकविणारे, धर्माच्या संरक्षणाची भाषा करणारे, सतत लोक कल्याणाची भाषा करणारे, जनतेचे कैवारी नेते यापैकी कोणीही ब्र शब्द काढत नाहीत. भावी पिढीसाठी उच्च शिक्षणाचे शिवाजी विद्यापीठाचे प्रांगण विकसित व्हावे, असे कुणालाच वाटत नाही. हा विद्यापीठाचा अपमानच आहे.- वसंत भोसले