समीर देशपांडेकोल्हापूर : आपल्या क्रांतिकारी निर्णयांनी देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराजांच्या धिप्पाड व्यक्तिमत्वाला ठेच पोहोचवणारा आहे. त्यामुळे तो बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. सदनामध्ये जाऊन आलेल्या अनेकांनी या पुतळ्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या या महाराष्ट्र सदनचे उद्घघाटन ४ जून २०१३ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सदनाच्या अग्रभागी शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा आहे. परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. आतील मोक्याच्या दर्शनी भागात छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. परंतु, हाच शाहू महाराजांचा पुतळा पाहून शाहूप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक मान्यवर २६ जून राेजी या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते. त्याचे फोटो महाराष्ट्रात व्हायरल झाल्यानंतर या पुतळ्याबाबत नाराजीच्या प्रतिक्रियांमध्ये वाढ झाली.पुतळ्यातील दोष
- शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे बलदंड आणि पैलवानी शरीरयष्टीचे होते. ते या पुतळ्यात कुठेही दिसत नाही.
- या पुतळ्यातील शाहू महाराजांची प्रकृती कृश असल्याचे दिसते.
- या पुतळ्यातील खांदे पडलेले असून, आजारपणातून उठल्यासारखा हा पुतळा आहे.
- डोळे खूपच आत गेलेले आहेत.
बघणारा चुकचुकतोचपश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाहू महाराजांचे पुतळे आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकातील पुतळा मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी उभारला होता. तो पुतळा पाहिलेले अनेकजण जेव्हा महाराष्ट्र सदनातील हा पुतळा पाहतात तेव्हा चुकचुकतात. ‘आमचे शाहू महाराज असे नव्हते’ हीच त्यांची प्रतिक्रिया असते.