कोल्हापूर : इराण येथील आल्हाददायक वातावरणाच्या पेक्षा भारतातील वातावरण केव्हाही चांगले आहे. त्यामुळे आम्हाला इथून लवकरात लवकर मायदेशी परत न्या, अशी आर्त विनवणी इराणमध्ये अडकलेल्या कोल्हापूरसह आसपाच्या जिल्ह्यातील ४४ पर्यटकांनी केली आहे.
वैद्यकिय पथक दाखल होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप पर्यटकांची तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्यांची घालमेल वाढली आहे. तेहरान, इराणमध्ये अडकलेले पर्यटक हे कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील आहेत. कोरोना विषाणू भीतीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीसाठी भारतातून गुरुवारी (दि.५) पथक इराणमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये तीन तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
पाच दिवस झाले तरी अद्याप या पथकाकडून पर्यटकांची तपासणी करण्यात आलेली नाही. या संदर्भात सहल आयोजक मुन्ना सय्यद हे वरचेवर जाऊन भारतीय वकिलातीमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. परंतु त्यांच्याकडून ठोस असे कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे पर्यटकांमध्ये बैचेनी व घालमेल वाढली आहे. येथील आल्हाददायक वातावरणापेक्षा केव्हाही मायदेशातील वातावरण चांगले आहे. त्यामुळे आम्हाला मायदेशी लवकरात लवकर न्यावे, अशी आर्त विनवणी या पर्यटकांनी केली आहे.
नुकतेच इराणमध्ये अडकलेले ५० हून अधिक काश्मिरसह आसपाच्या भागातील पर्यटक भारतीय वायूसेनेच्या विमानातून भारतात दाखल झाले आहे.