कोल्हापूर : जवाहरनगर, सहस्त्रअर्जुन पार्क परिसर, रेणुका मंदिर चौक येथील ड्रेनेजलाईनच्या कामावरून तणाव निर्माण झाला आहे. विकासकाने महापालिकेची परवानगी घेतली नसताना रस्त्याची बेकायदेशीर खोदाई केली. परिसरातील नाला संरक्षक भिंत बांधून वळवल्यामुळे ७० नागरिकांच्या घरामध्ये दूषित, सांडपाणी शिरत असल्याचा आरोप करीत त्यांनी शनिवारी ड्रेनेजलाईनचे काम बंद पाडले. जल अभियंता नारायण भोसले यांनी संबंधित विकासकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर आक्रमक झालेले नागरिक शांत झाले. यानंतर काम पूर्ण करण्यात आले.
रेणुका मंदिर चौकामध्ये विकासक पारस ओसवाल यांच्याकडून ड्रेनेजलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला. महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईन घालत असल्यामुळे त्यांनी एका पाईपलाईनची तोडफोडही केली. १ जानेवारीस काम सुरू केले आणि नागरिकांनी महापालिकेच्या निदर्शनास आणल्यानंतर ८ जानेवारीस परवानगी दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
चौकट
भिंत काढून नाला करण्याची मागणी
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने परवानगी दिली आहे. वरुण बोडेकर यांच्या घरापासून रेणुका मंदिरापर्यंत पारस ओसवाल यांनी बेकायदेशीर पद्धतीने संरक्षक भिंत बांधून नैसर्गिक पद्धतीने येणारे पाणी वळविले आहे. ही भिंत काढून १० फुटांचा नाला करण्याची मागणी विशाल जाधव, उमेश जाधव, अमित कांबळे, वरुण बोडेकर आदींनी पत्रकाद्वारे केली.
महापालिकेची रितसर परवानगी घेतली आहे. ५२ हजार रुपये रस्ते खुदाई भरली आहे. कोणताही दंड आकारणी नाही. जर आपले काम बेकायदेशीर असल्यास ते त्वरित काढून घेवू. या परिसरातील ड्रेनेजलाईन १९७६ पूर्वीची असून दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषित होत होते. म्हणून, ती वळवून मुख्य पाईपलाईनला जोडली आहे. जयंती नाला जयंती नदी होण्यासाठी आपला प्रयत्न आहे. मात्र, दंडुकेशाही लोकांमुळे विकासकामे करणाऱ्यांना त्रास होत आहे. ड्रेनेजच्या पाईपलाईनची तोडफोड करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी.
पारस ओसवाल
पूजा बिल्डर्स, कोल्हापूर