कोपार्डे : करवीर तालुक्यातील आडूर, शिये गावातील उमेदवारानी अतिक्रमण केल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवावेत, यासाठी हरकती आल्यानंतर अर्ज वैध वा अवैध ठरविण्यावरुन गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच वादावादी सुरू होती. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन उमेदवारी अर्ज अवैध ठरवावेत, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवत आपल्याला तसे अधिकार नसल्याचे सांगत हा विषय संपवला.
करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या २ हजार ४५४ उमेदवारी अर्जाची छाननी गुरुवारी होती. कृषी महाविद्यालयात झालेल्या या छाननीवेळी आडूर गावातील भिवाजी निरुके, भगवान भोसले, बाजीराव पाटील यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुहास गोदे यांनी गायरानमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप करत त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात यावा, अशी हरकत दाखल केली. परंतु, गोदे यांनी गायरानमध्ये अतिक्रमण केल्याचे सिध्द झालेले नाही. त्याशिवाय या मुद्द्यावर या हरकतीद्वारे या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्याचे विशेष अधिकार आपणाला नाहीत, असे सांगून निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरवण्याबाबत असमर्थता दर्शवली. यावेळी आडूरच्या हरकतदारांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकीलही आणले होते.
शिये येथील माणिक पाटील यांचा अर्ज अवैध ठरविल्याचे समजताच त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने गोंधळ झाला. मागील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलवली होती. त्यावेळी आपण तो सादर केल्याची प्रत निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवली. जर माझी उमेदवारी अवैध ठरवाल तर माझ्या प्रभागातील निवडणूक स्थगितीसाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
चौकट
१) आडूर येथील गायरान अतिक्रमण प्रकरणात अतिक्रमण केलेल्या जागेचे फोटो, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, मंडल अधिकारी यांनी जागेवर पंचनामा करून करवीर पोलिसांमध्ये १६८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रक्रियेत असणारी यंत्रणाच निवडणूक यंत्रणा राबवत आहे. २) आॅनलाईनबरोबर आॅफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा दिल्याने वैध-अवैधचा मेळ लागत नव्हता. कर्मचारी उशिरापर्यंत हे काम करत होते.
(फोटो कँप्शन) शियेतील माणिक पाटील यांनी मागील ग्रामपंचायत निवडणूक खर्च दाखल केला नसल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. यावेळी पाटील यांनी हा खर्च दाखल केलेली प्रत निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवली आणि गोंधळ झाला.