कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील भारत राखीव बटालियनची आरक्षित सुमारे ११७ एकर जागा विस्तारीकरणासाठी यंत्रणा देऊन ज्यांनी हातभार लावला, आता तेच विरोध करून सदर जागा गावच्या ताब्यात राहण्यासाठी जीवाचे रान पेटवत आहेत.
नंदवाळ तीर्थक्षेत्राला शासनाने ‘ब’ दर्जा दिल्याने ही जागा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हवी असल्याबाबत ग्रामस्थ ठाम आहेत. खरंतर याच जागेशेजारी गटनंबर ५२० मधील सुमारे ६५ एकर असलेल्या गायरान जागेचा पर्याय ग्रामस्थांनी विकासासाठी पुढे करणे सोयीचे ठरणार आहे. हा वाद विकोपाला जाताना लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीसाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे.नंदवाळ (ता. करवीर) गावातील गट नं. ६३ ची ११७ एकर गायरान जागा शासनाने भारत राखीव बटालियन क्र. ३ ला अडीच वर्षांपूर्वी दिली. जागेच्या सपाटीकरणासाठी गावातील जेसीबी, ट्रॅक्टर, ट्राॅलीसह यंत्रणा लागली. सध्या येथे दिवसभर ८०० हून अधिक जवानांच्या सात तुकड्या कवायती करतात.बटालियनमुळे भविष्यात नंदवाळच्या विकासाचे संकेत असताना अचानक काही नेत्यांनी रिंगण सोहळ्यासाठी संबंधित जागा हवी असल्याचा हट्ट धरून वादाला तोंड फोडले. बटालियनच्या एकूण जमिनीपैकी ६५ एकर ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी, त्या बदल्यात गट नं. ५२० ची ६५ एकर जागा बटालियनने घ्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणखासगी ॲकॅडमीमध्ये तरुणांना लाखो रुपये शुल्क आकारून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. पण या बटालियनच्या जागेत नंदवाळ परिससरातील सुमारे ६० हून अधिक तरुणांना विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे.
तलाव आणि बटालियननंदवाळ गायरानमध्ये १९९० मध्ये माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी तलाव मंजूर करून २००५ मध्ये त्याचे काम पूर्ण केले. तलाव पूर्ण करतानाही त्यावेळीही काहींनी विरोध केला होता. तलावासाठीच्या जागेची माेजणी, भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम मध्यरात्रीच पोलीस बंदोबस्तात पूर्ण केले होते; पण त्याच तलावामुळे सध्या गावातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे.
कोल्हापूर मागेचभारत राखीव दलाचा गट आपल्या गावात स्थापन व्हावा यासाठी अनेक ठिकाणांहून मागणी असते. हा गट स्थापन झाल्यानंतर शेजारील गावात विकासगंगा वाहते, असे समजले जाते. कोल्हापूरनंतर राज्यात गडचिरोली, पुसटगाव (अहमदनगर), अकोला, चंद्रपूर येथे बटालियनचे गट स्थापन झाले, तेथे गटावर बांधकामेही सुरू झाली, पण नंदगाव (कोल्हापूर)मध्ये आंदोलनामुळे गटाला विकासकामाची गती येईना असे काहींनी बोलून दाखविले.
दरमहा ५ ते ६ कोटी पगार
सध्या ८०० जवानांवर दरमहा पाच ते ६ कोटी रुपये वेतनापोटी खर्च होतात. पूर्ण क्षमतेने गट सुरू झाल्यास जवानांची संख्या वाढणार, १० कोटीपर्यत वेतनावर खर्च होणार आहे. त्याच्या निवासासाठी उभारलेल्या क्वाॅटर्समध्ये कुटुंबीयांचे वास्तव्य असेल. त्यांना दैनंदिन व्यवहारासाठी नंदवाळ गावकऱ्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात विकासाची गंगा वाहणार आहे.
जमीन हस्तांतराचा आदेश निघताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही, आमचा बटालियनला विरोध नाही, पण तीर्थक्षेत्र विकासासाठी ‘बटालियन’ने जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे द्यावी.- अस्मिता युवराज कांबळे, सरपंच, नंदवाळ.