कोल्हापूर : दोन दिवसांवर परीक्षा असताना आरोग्य संचालनालयाकडून अपात्र ठरविल्याने प्रवेशपत्र मिळत नसल्याने कोल्हापूर विभागातील शुश्रूषा संवर्गातील ३५ हून अधिक परिचारिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांसाठी उद्या, रविवारी घेण्यात येणाऱ्या विशेष लेखी परीक्षेसाठी पात्र करावे, या मागणीचे निवेदन परिचारिकांच्या शिष्टमंडळाने आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांना दिले.
दि. १५ एप्रिल २०१५ पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत बंधपत्रित अधिपरिचारिकांना विशेष लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बंधपत्रित अधिपरिचारिकांनी त्यांचा प्रस्ताव आरोग्य विभागाला सादर केला. तथापि २६ आॅगस्ट २०१९ रोजी कार्यरत नसल्याचे सांगून या पारिचारिकांना संबंधित लेखी परीक्षेला बसण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले.
पुनर्नियुक्तीसाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सादर करूनही मागील बंधपत्रित सेवाकाळ संपल्यानंतरही पुनर्नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे सध्या त्या कार्यरत नसल्याने त्यांना या परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. म्हणून या प्रशासकीय, तांत्रिक बाबींचा विचार करून त्यांना या परीक्षेसाठी बसण्यास पात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी या परिचारिकांनी निवेदनाद्वारे केली. त्यांच्या वतीने महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा हशमत हावेरी यांनी चर्चा केली. त्यावर आपली मागणी शासनापर्यंत पोहोचविली जाईल, असे आश्वासन चौधरी यांनी यावेळी दिले.
यादीमध्ये पात्र असल्याचा उल्लेख?या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी कोल्हापूर मंडळाने दि. १७ सप्टेंबरला जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील सर्व परिचारिकांच्या नावांसमोर ‘पात्र’ असे लिहिले होते. मात्र, त्याच दिवशी सायंकाळनंतर प्रसिद्ध केलेली यादी काढण्यात आली. या मंडळाकडून असे का करण्यात आले ते समजले नसल्याचे काही परिचारिकांनी सांगितले.
बंधपत्रित सेवाकाळ संपल्यानंतर संबंधित परिचारिकांना शासनाने पुनर्नियुक्ती देणे आवश्यक होते. ती दिली नसल्याने या परिचारिकांची अडचण झाली आहे. संबंधित तांत्रिक अडचण दूर करून शासनाने त्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी द्यावी. या परिचारिकांसाठी आमच्या संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी आरोग्य विभागाशी चर्चा करणार आहेत. शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही न्यायासाठी ‘मॅट’मध्ये जाणार आहोत.- हशमत हावेरी
शासन आदेश आणि वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांनुसार कोल्हापूर मंडळाकडून कार्यवाही केली जाते. निवेदनाद्वारे शुक्रवारी परिचारिकांनी केलेली मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यावर शासनाकडून येणाऱ्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.- भावना चौधरी