कोल्हापूर : मराठा समाजाला इतर मागासमधून आरक्षण नको, अशी भूमिका जाहीर करून तसे झाल्यास ‘काठी हातात घेऊन रस्त्यावर उतरू’ अशा शब्दात राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला धमकी दिली आहे. त्यामुळे दोन जातींमधील सलोखा धोक्यात आला असून यामुळे त्यांना मंत्री म्हणून अपात्र ठरवावे, अशी मागणी ॲड. प्रवीण इंदूलकर आणि दिलीप देसाई यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलेली विधाने आक्षेपार्ह आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे. मात्र, इतर मागासांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिले पाहिजे. कारण इतर मागासांना घटनेने अधिकार दिला आहे. तो जर कोणी हिसकावून घेत असेल तर धनगराची काठी घेऊन रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले आहेत.
या विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचली आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व लोकांशी निर्भयपणे व नि:स्पृहपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा द्वेषभाव न ठेवता वागेन असे त्यांनी कबूल केले होते. याच्या उलट त्यांनी ही विधाने केली आहेत. त्यामुळेच मंत्रिपदावर राहण्यास ते अपात्र ठरत आहेत. राज्यघटना व कायद्याच्या राज्याची संकल्पना अबाधित ठेवण्यासाठी आपण या विषयाचा योग्य अभ्यास, चौकशी, कार्यवाही आणि कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.