लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथे तरुणांसह नाराजांना डावलल्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याला खो बसला आहे. त्यामुळे मंडलिक, मुश्रीफ, संजय घाटगे, राजे या चारही गटांविरोधात युवा कार्यकर्त्यांनी आघाडी करत आपली वेगळी मोट बांधली आहे. त्यामुळे ३५ वर्षांची येथील बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा दुसऱ्या वर्षीही खंडित होण्याची शक्यता आहे.
ग्रामदैवत चौंडेश्वरी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकसंघ होत ग्रामस्थांनी तब्बल ८० लाखांची लोकवर्गणी जमा केली तसेच श्रमदानातून या मंदिराचा जीर्णोद्धारही पूर्ण केला. गेल्या दहा महिन्यात गट-तट याचा लवलेशही येऊ न देता ग्रामस्थांनी हातात हात घालून मंदिर उभारले. दिनांक २३ ते २६ जानेवारी दरम्यान या मंदिराचा वास्तूशांतीचा कार्यक्रमही थाटामाटात होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतून पुन्हा मतभेद उद्भवू नयेत, यासाठी ग्रामस्थांनी ती बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता. मात्र, बिनविरोधसाठी निवड करताना मतभिन्नता झाल्याने गावावर निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मुश्रीफ गटाचे नारायण ढोले, मंडलिक गटाचे तुकाराम ढोले, घाटगे गटाचे ईश्वरा देवडकर व राजे गटाचे अरुण शिंत्रे या गटप्रमुखांनी मोट बांधली आहे तर जयसिंग पाटील, धनाजी पाटील, रोहित लोहार, अजित ढोले तसेच अन्य काही गटातील नाराज युवकांनी एकत्रित येत त्यांना आव्हान निर्माण केले आहे.
दोन जागा बिनविरोध...
प्रभाग दोनमधून घाटगे गटाच्या गीता गणपती गुरव व प्रभाग तीनमधून मुश्रीफ गटाच्या प्राजक्ता साताप्पा कांबळे यांच्याविरोधात अर्ज न आल्याने या दोन जागा बिनविरोध होणार आहेत.