कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास दोन वर्षांपूर्वी विशेष तपास पथकाकडून काढून दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवला. मात्र, एटीएसकडून तपासात काहीच प्रगती नसल्याची तक्रार पानसरे कुटुंबीयांनी बुधवारी (दि.१४) मुंबई उच्च न्यायालयात प्रतित्रापत्राद्वारे केली तसेच गुन्ह्याच्या कटाचा उलगडा करून तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी, यासाठी न्यायालयाने एटीएसला निर्देश द्यावेत, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे.एटीएसच्या तपासाबद्दल नाराजी आणि असमाधान व्यक्त करणारे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी ॲड. अभय नेवगी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. कर्नाटक पोलिसांनी डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनातील आरोपींना पकडून खुनाचा उद्देश शोधला. त्याउलट गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही एसआयटी आणि एटीएसला सापडलेले नाहीत. विशेष पथकाने तपासात अपेक्षित प्रगती दाखविली नसल्याने हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला.मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ मुदतवाढ घेण्याशिवाय त्यांनी काहीच तपास केला नाही, असा आरोप पानसरे कुटुंबीयांनी केला आहे. तपासाबद्दल आम्ही असमाधानी असून, गुन्ह्यातील कट, कट रचणारे संशयित आरोपी आणि मारेकरी यांचा तातडीने शोध घेण्याबद्दल न्यायालयाने एटीएसला निर्देश द्यावेत, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे.
पानसरेंच्या पुस्तकांबद्दल राग?गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाला काही प्रतिगामी विचारधारेच्या संघटनांनी आक्षेप घेतले होते. काही ठिकाणी पानसरे यांच्या व्याख्यानांना विरोध झाला होता. त्यांचे पुरोगामी विचार संपवण्यासाठीच त्यांच्यावर हल्ला झाला. या गुन्ह्यांमागे व्यापक षङ्यंत्र असून, त्याचा उलगडा व्हावा, अशी अपेक्षा पानसरे यांच्या कुटुंबीयांनी प्रतिज्ञापत्रातून व्यक्त केली आहे.जिल्हा न्यायालयात आज सुनावणीपानसरे खूनखटल्याची सुनावणी गुरुवारी (दि. १५) जिल्ह व सत्र न्यायालयात झाली. यावेळी एका पंच साक्षीदाराची साक्ष आणि उलट तपासणी झाली. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी साक्ष घेतली. आज, शुक्रवारी आणखी एका पंच साक्षीदाराची साक्ष होणार आहे.