सावरवाडी : समाजात आदर्श पिढी घडविण्याची ताकद आई-वडिलांमध्ये असते. आजच्या बदलत्या काळात मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. रक्ताची नाती बिघडली की समाजाची अधोगती होते. समाज घडविण्यासाठी संस्कारक्षम नवी पिढी तयार करणे आवश्यक आहे. आई-वडिलांच्या विचारांचा नव्या पिढीने आदर करावा, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे एकनाथ विद्यालय व शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जनाबाई पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील होते. कार्यक्रमस्थळी २०० शाळकरी मुला-मुलींनी मातापित्यांची पाद्यपूजा केली. पाल्यांनी मनोभावे आपल्या मातापित्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी देशमुख म्हणाले, मोबाईल, सोशल मीडिया आणि व्यसने यामध्ये आजची तरुण पिढी गुंतल्याने आदर्श जीवनाचा अर्थच गमावला आहे. सुशिक्षित मुलांकडून आई-वडिलांच्या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या बळावू लागली, ही शोकांतिका आहे. शालेय वयातच मुलांच्यावर चांगले संस्कार केले तर देश आदर्शवादी बनेल.ते म्हणाले, सुखी कुटुंबातच संस्काराची बीजे रोवली पाहिजेत. रक्ताची नाती सुधारली तर देशात सौख्य नांदेल. आई-वडिलांच्या विचारांचा आदर केल्याने घराला घरपण येईल. नव्या पिढीला संत विचारांची शिकवण देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. आदर्श संस्कारासाठी पाद्यपूजा यासारखे उपक्रम सातत्याने राबविले पाहिजेत.विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
शाळेतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी प्रास्ताविक, स्वागत केले. मुख्याध्यापक एस. पी. खंद्रे यांनी आभार मानले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती अमरीशसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक सत्यजित पाटील, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, राजेश पाटील, जयश्री पाटील (चुयेकर), इस्लामपूर मार्केट कमिटीचे सभापती आनंदराव पाटील, रयतकृषी सेवा संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, उपाध्यक्षा माधुरी जाधव, प्राचार्य मंगला बडदारे, नंदकुमार पाटील, राहुल पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, वीरशैवबँकेचे उपाध्यक्ष अनिल सोलापुरे, युवक काँग्रेसचे सचिन पाटील,युवा नेते सुनील पाटील, तुकाराम पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, संजय पाटील, बाजीराव पाटील, बाबूराव खोत, आदी मान्यवर उपस्थितहोते.शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे एकनाथ विद्यालय व शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जनाबाई पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात २०० शाळकरी मुला-मुलींनी मातापित्यांची पाद्यपूजा केली.