लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी अशाप्रकारची चाचणी घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना गुरूवारी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. साळे यांनी नियोजन केले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील ग्रंथालयात ही चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सुरूवातीला अजयकुमार माने, डॉ. योगेश साळे, डाॅ. फारूक देसाई यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी अशा २०० जणांची चाचणी करण्यात आली. यावेळी चाचणीचे किट्स संपल्यामुळे काहीजणांची चाचणी करण्यात आली नाही. दरम्यान, चाचणी केलेल्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, त्यांच्याकडील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश विलासराव नलवडे, अमित तुकाराम नलवडे, स्मिता मारुती शिंदे , उत्तम महिपती कलिकते, संतोष श्रीपती गुरव यांच्या वैद्यकीय पथकामार्फत या चाचण्या करण्यात आल्या. उर्वरित कर्मचाऱ्यांची ॲन्टिजेन चाचणी सोमवारी करण्यात येणार आहे.
२३०४२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेत शुक्रवारी ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांचीही यावेळी चाचणी करण्यात आली.