कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेेते आमदार डॉ. विनय कोरे यांना महाविकास आघाडीसोबत घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास जनसुराज्यच्या सहा सदस्यांचे पाठबळही आघाडीला मिळणार आहे.
राज्याच्या राजकारणात डॉ. कोरे भाजपसोबत आहेत. पण काही महिन्यांपूर्वी गोकूळच्या निवडणुकीत डॉ. कोरे काॅंग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिले. यापुढील काळात म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीत डॉ. कोरे यांना सोबत घेतल्याचा फायदा महाविकास आघाडीस होणार आहे. यामुळे डॉ. कोरे यांच्याशी राजकीय दोस्ती कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
चौकट
आमदार पी. एन. पाटील
यांची भूमिकाही महत्त्वाची
गोकूळच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी पालकमंत्री पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यापासून दूर गेले. त्यानंतर झालेल्या कॉंग्रेसच्या एका जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांनी आता गोकूळचे संपले, पी. एन. आणि मी एकाच पक्षात आहोत. यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लावणार असे, स्पष्ट केले. यानंतर पहिल्यादांच जि. प. मधील पदाधिकारी बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हेही इच्छुक आहेत. पण अध्यक्षपदासाठी यावेळी त्यांचे नाव काॅंग्रेसकडून मागे पडले आहे. या रागातून आमदार पी. एन. पाटील पदाधिकारी बदलात काय भूमिका घेणार यासंबंधी उत्सुकता आहे.