कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीला २ कोटी २३ लाख रूपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजीव परीट यांनी दिली. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.
परीट म्हणाले की, १ एप्रिल २०२० पासून कर्जाचा व्याज दर १० टक्के करण्यात आला आहे. ३३७४ सभासद असलेल्या संस्थेकडे ११ कोटी २९ लाख रुपयांचे भागभांडवल असून, ११६ कोटी १५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. ११६ कोटी ७६ लाख रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली असून, १५९ कोटी ४ लाख रुपयांचे खेळते भांडवल आहे. ३१ कोटी ११ लाख रुपयांची संस्थेने गुंतवणूक केली असून, १७ कोटी ४० लाख रुपयांचा निधी आहे.
सन २०२०/२१ सालासाठी सभासदांना १२.५० टक्के लाभांशाची १ कोटी ४१ लाखाची रक्कम अदा केली जाणार आहे. तर सन २०२०/२१ सालासाठी सभासदांना कायम ठेवीवर १० टक्के व्याजाची ९६ लाख ६४ हजाराची रक्कम अदा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच वरील सालासाठी सभासदांना वर्गणी ठेवीवर ९ टक्के व्याजाची ९२ लाख ४४ हजाराची रक्कमही अदा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.