कोल्हापूर : सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक, क्रीडा, आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव ‘सखी सबला फौंडेशन’च्या वतीने येथे करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘सबलत्वाचा गौरव’ या कार्यक्रमात कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या संस्थापिका शोभा तावडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये अमरजा निंबाळकर, सुप्रिया वकील, रूपाली पाटील, डॉ. भाग्यश्री मुळे, साजिदा चौगुले, शीला पाटील, दीपा देशपांडे, हेमा पाटील, सीमा मालाणी, पूजा पवार, सौमिनी शिंदे, वृषाली शिर्के, मधुरा बाटे, वृषाली कुलकर्णी, ज्ञानेश्वरी घळसासी, कविता घळसासी, सोनाली देसाई, वैशाली काशीद, राजश्री निंबाळकर, सुप्रिया निंबाळकर, दीपाली वैद्य, सारिका बकरे, पूनम भंडारी, कल्पना सावंत यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिया शहा यांनी प्रार्थना गाइली. फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आशा मणियार यांच्या हस्ते शोभा तावडे यांचा सत्कार करण्यात आला. ‘सखी सबला फौंडेशन’ ही महिलांनी महिलांसाठी चालविलेली सामाजिक संस्था आहे. सामाजिक कर्तव्य, मैत्र जपत ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पोहोचली आहे.
स्वयंम विशेष मुलांच्या शाळेस मदत, घरातील गॅस, फ्रिज दुरुस्ती कार्यशाळा, अभ्यास सहल, आदी उपक्रम रौप्यमहोत्सवी वर्षात राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मणियार यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्षा हिमा शहा, कार्यवाह सरिता शहा, खजानिस रेखा मेहता, आदी उपस्थित होत्या. स्वाती शहा यांनी स्वागत केले. पूनम शहा यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री शहा यांनी आभार मानले.
देणारे हात व्हावेवेळ, नाती यांच्या व्यवस्थापनाचे कौशल्य महिलांकडे जन्मत: आहे. त्यांना ते निसर्गाचे देणे लाभले आहे. त्यावर पुरुषी मानसिकतेचे आक्रमण होत असेल, तर महिलांनी विरोध केला पाहिजे. येणाऱ्या विविध अडचणींवर मात करून स्वत: सक्षम व्हावे. महिलांनी मागणाऱ्यांऐवजी देणारे हात व्हावे, असे आवाहन शोभा तावडे यांनी केले.