कोल्हापूर : बोचरी थंडी, महिलांची अलोट गर्दी आणि गीतांची बरसात, नृत्यांची धमाल, शिट्ट्या, टाळ्या अशा जल्लोषी व उत्साही वातावरणात शनिवारी (दि. १६) सायंकाळी मेसर्स गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘सखी सन्मान पुरस्कार सोहळा’ कोल्हापुरात उत्साहात झाला. यावेळी समाजातील विविध घटकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अभिनेत्री किशोरी शहाणे, गायक स्वप्निल बांदोडकर व ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, मनुष्यबळ प्रशासन उपव्यवस्थापक संतोष साखरे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.यंदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, तर डॉ. प्रमिला जरग (सामाजिक), शोभा तावडे (शैक्षणिक), डॉ. मंजुळा पिशवीकर (आरोग्य), मल्ल रेश्मा माने (क्रीडा), मंजूश्री गोखले (सांस्कृतिक व साहित्यिक), करवीर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक पुष्पलता मंडले (शौर्य), पूजा आजरी (व्यावसायिक) यांना, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीच्या माया रमेश गुरव (सामाजिक), साताºयातून स्वाती हेरकल (शैक्षणिक), पंढरपूर (जि. सोलापूर)च्या सुषमा हावळे (शौर्य), पुण्याच्या अंकिता गुंड (क्रीडा) व कोल्हापूर जिल्ह्यातील डॉ. मंजुळा पिशवीकर (वैद्यकीय), तर पूजा आजरी (उद्योग व व्यवसाय) यांना ‘सखी सन्मान अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.यासाठी रिलायन्स स्मार्ट ट्रॉफी पार्टनर, डी.वाय.पी. सिटी व्हेन्यू पार्टनर, तर हॉटेल सयाजी हॉस्पिटॅलिटी पार्टनर होते. किशोरी शहाणे व गायक स्वप्निल बांदोडकर यांचा ‘सूर तिच्यासाठी ’ हा रंगतदार गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी भालकर्स कला अकादमीच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सॅँड आर्टचे अमित माळकरी यांनी रांगोळी काढून ‘कन्या वाचवा’ असा संदेश दिला.कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. यावेळी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, बॉबी वीज, बन्सी चिपडे, मुरली चिपडे, गिरिधर चिपडे, शुभलक्ष्मी कोरे यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ‘लोकमत सखी मंच’च्या २०१८ च्या सभासद नोंदणीच्या भेटवस्तूंचे अनावरण किशोरी शहाणे व बॉबी वीज यांच्या हस्ते झाले.प्रास्ताविकात वसंत भोसले यांनी, ‘लोकमत’ने वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. ‘सखी मंच’च्या या उपक्रमात स्वयंसेवक, मदतीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. महिलांचे विविध प्रश्न ‘सखी’ या पुरवणीत मांडले जातात. प्रसिद्धीपासून दूर असलेल्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तुमच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे. त्यातच चिपडे सराफ यांनी या कार्यक्रमाला बळ दिले असून, २८ जानेवारीला होणाºया महामॅरेथॉन स्पर्धेतही आपण एकत्र येण्याचे काम करणार आहोत. ‘लोकमत’ला असेच पाठबळ राहू द्या, असे सांगितले.छाया सांगावकर म्हणाल्या, हा पुरस्कार माझा नसून तो माझ्या वडिलांचा आहे. वडील उस्ताद म्हमूलाल सांगावकर यांच्यामुळे मी येथपर्यंत पोहोचले. हे त्यांचे यश आहे. हा पुरस्कार नोबेल पुरस्कारापेक्षा मोठा आहे. मी ‘लोकमत’ची वाचक आहे. ‘लोकमत’चे उपक्रम बरेच आहेत. लोकांचे मन जाणून घेणे म्हणजे ‘लोकमत’ होय. त्यांना माझा सलाम.डॉ. मंजुळा पिशवीकर म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा. माझ्या व्यवसायात सासू-सासºयांचे मार्गदर्शन मिळाले. डॉक्टर आणि रुग्ण असा भेदभाव न मानता मी प्रथम माणूस म्हणून रुग्णाला प्राधान्य देते.सोनाली चिपडे म्हणाल्या, चिपडे सराफांच्या घरी आम्हा सुनांना सोन्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सासºयांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आत्मविश्वास मिळाला. ग्राहकांसाठी ७ ते १८ जानेवारी २०१८ दरम्यान ‘मोती महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा.‘रिलायन्स’चे झोनल मॅनेजर आशिष तेंडुलकर म्हणाले, गेली पाच वर्षे आम्ही सेवा देत आहेत. आम्ही विविध दर्जेदार उत्पादने ठेवतो. भारतात ५७५ छोट्या, तर ८५ मोठ्या शहरांत ‘रिलायन्स’चे मॉल आहेत.यावेळी चिपडे सिल्व्हर व्हॅलीच्या श्यामला चिपडे, संजीवनी चिपडे, रिलायन्सचे मार्केटिंग मॅनेजर अंकुश पाटील, क्लस्टर हेड वासीम खतीब, हॉटेल सयाजीचे सरव्यवस्थापक पुनित महाजन, डीवायपी सिटीचे चीफ एक्झिक्युुटिव्ह सिद्धार्थ साळोखे, एक्स्प्लोरर कोल्हापूरच्या संस्थापक-संचालक प्रिया साळोखे, शारदा महाजन, आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रिया दंडगे व वृषाली शिंदे यांनी निवेदन केले. ‘सखी मंच’ संयोजन सदस्य वारणा वडगावकर यांनी आभार मानले.कोल्हापूर हे माझं माहेर : किशोरी शहाणेप्रश्न : आपल्या करिअरच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापुरात झाले. त्या विषयीच्या आठवणी आज जाग्या झाल्या आहेत का?किशोरी शहाणे : खरं आहे, माझी सुरुवात ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटातून झाली. ‘लोकमत’ने चांगल्या काम करणाºया महिलांचा गौरव केला. हा उपक्रम चांगला आहे. माझ्या घरात ‘लोकमत’ येतो. मी ‘लोकमत’ची वाचक आहे. वर्षानुवर्षे मी कोल्हापुरात शूटिंगसाठी आले. त्यामुळे कोल्हापूर हे जिवा-भावाचे शहर आहे. इथला तांबडा-पांढरा रस्सा, बावड्याची मिसळ आणि म्हशीच्या दुधाचा मी मनसोक्त आस्वाद घेतला आहे. खूप बरे वाटले. हे माझे माहेर आहे.यासाठी मी माझा मुलगा बॉबीला प्रथमच आज कोल्हापुरात या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेऊन आले. आजची सायंकाळ ही अविस्मरणीय आहे. भालकर्स अकादमीच्या कलाकारांनी केलेला नृत्याविष्कार कौतुकास्पद आहे.प्रश्न : आपण मराठी, दीपक वीज हे पंजाबी; हे सूर कसे जुळले?शहाणे : मला दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांनी ‘बॉम्ब ब्लास्ट’ व ‘हफ्ता बंद’ या चित्रपटांसाठी घेतले. यातूनच मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतरविवाह झाला.प्रश्न : गृहिणी म्हणून घरी कोणकोणते मराठी पदार्थ करता ?किशोरी : विवाहावेळी थोडेफार जेवण येत होते. पण, त्यानंतर मी आईकडून स्वयंपाक शिकले. आज वेळ मिळेल तेव्हा उत्कृष्ट स्वयंपाक करून घरच्यांना खाऊ घालायला आवडते.प्रश्न : तुमच्या फिटनेसचे रहस्य काय ?किशोरी : गृहिणी म्हणून काम करताना खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यायाम फार गरजेचा आहे. रोज ४५ मिनिटे व्यायाम करा, म्हणजे फिटनेस व्यवस्थित राहील.
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:52 AM