कोल्हापूर : कोल्हापूूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी) केंद्र शासनाच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून १०४ नव्या बसेस खरेदी करीत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ७५ बसेसची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, उर्वरित २९ बसेसचा मार्ग काही सदस्यांनी बसच्या रचनेत ‘खोट’ दाखवीत रोखून धरला होता. केंद्र शासनाने वेळेत बसखरेदीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास निधी वळविण्याचे पत्र केएमटी प्रशासनास दिले होते. परिवहन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २९ बसेस खरेदीला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे १०४ बसेसचा मार्ग मोकळा झाला आहे.‘केएमटी’च्या पहिल्या बसची चाचणी प्रक्रिया ३ फेब्रुवारीला पार पडली. त्यानंतर २५ बसेसचा पहिला ताफा १ मार्चपूर्वी मिळणार आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील २९ बसचा मार्ग ‘चिरीमिरी’साठी रोखला होता. अखेर निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाल्यानंतर परिवहन सभापती अजित पोवार यांनी पुढाकार घेत समितीच्या बैठकीत २९ बसेस खरेदीच्या प्रस्ताव मान्य केला. काही सदस्यांच्या उघड व छुप्या विरोधाचा सामनाही पोवार यांनी केला. अखेर समितीने २९ बस खरेदीसाठी अशोक लेलॅँड कंपनीचा ठेका मंजूर केला. अत्याधुनिक वाहतूक प्रणालीसाठी फौंटनहेड इन्फोसोल्युशन या कंपनीला २.१८ कोटींचा ठेका देण्याचे परिवहन समितीने निश्चित केल्याची माहिती सभापती अजित पोवार यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)यापूर्वी दिलेल्या ७५ बसेसप्रमाणेच नवीन २९ बसेसची रचना असणार आहे. तसेच नवीन अत्याधुनिक बसेससोबत जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, मुख्य बसथांब्यावर एलईडी फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, इ-टिकेटिंग प्रणाली, संगणकीकृत पास वितरण यंत्रणा, कार्यान्वित केली जाणार आहे.अत्याधुनिक १०४ बसेसमुळे शहराच्या सौदर्यात भर पडणार आहे. येत्या काही दिवसांत या बसेस शहरातील रस्त्यांवर धावतील. यानंतर केएमटीचे दैनंदिन उत्पन्न व शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होईल. - अजित पोवार (सभापती, परिवहन समिती)
‘त्या’ २९ बस खरेदीतील विघ्न दूर
By admin | Published: February 10, 2015 11:21 PM