- समीर देशपांडे
कोल्हापूर : महापूर ओसरल्यानंतर केवळ चार दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल अडीच लाख पुस्तके वितरित करण्याची कामगिरी शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘बालभारती’ने करून दाखविली आहे.महापुरात हजारो विद्यार्थ्यांची शालेय पुस्तकेही भिजून गेली. एकीकडे शाळांच्या इमारतींमध्ये पाणी शिरले तर काही शाळा इमारतीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकेच नाहीत तर शाळेत जाऊन काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होता.मात्र, ‘बालभारती’ हे आव्हान स्वीकारले. पूर उतरण्याआधीच बाधित विद्यार्थ्यांची संख्या संकलित करून पुस्तकांची संख्या निश्चित केली.े गोरेगाव, पनवेल, पुणे, लातूर येथील शिल्लक पुस्तके तातडीने मागवून घेतली. पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके मागवून तातडीने त्याचे वितरणही सुरू केले आहे.