कोल्हापूर : चांदोलीच्या कोडोली, पारगाव व मसुदमाले येथील ८१ प्रकल्पग्रस्तांना जाखले (ता. पन्हाळा) येथील प्रत्येकी एक एकर याप्रमाणे ८१ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. आंदोलनाच्या बडग्यानेच प्रशासनाने तातडीने ही प्रक्रिया राबविल्याचे दिसत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या अध्यक्षतेखाली जमीन वाटपासाठी सोडत काढण्यात आली. यावेळी पुनर्वसनाचे तहसीलदार जयवंत पाटील, हातकणंगलेचे तहसीलदार सुधाकर भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, राजाराम पाटील उपस्थित होते.चांदोली अभयारण्यात बुडित झालेल्या तांबवेपैकी कुल्याची वाडीची वसाहत कोडोली (ता. पन्हाळा) व ढाकाळेची वसाहत मौजे पारगाव (ता. हातकणंगले) येथे वसविण्यात आली आहे. वसाहत झाली असली, तरी त्यांना जमिनी मिळाल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी जाखले (ता. पन्हाळा) येथील ३४.२७ हेक्टर जमीन मंजूर झाली आहे; परंतु त्याचे वाटप अद्याप झाले नसल्याने विनाशेतीच प्रकल्पग्रस्तांना दिवस ढकलावे लागत होते. आंदोलनाचा बडगा उगारल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जमीन वाटपाची प्रक्रिया राबविल्याचे दिसत आहे.
गुरुवारी पात्र असलेले सर्व प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. दुपारी बाराच्या सुमारास सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. होलीक्रॉस इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनी शौर्या व सई शशिकांत सातपुते यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
यामध्ये पारगाव वसाहतमधील ५८ प्रकल्पग्रस्तांना व कोडोली, माले वसाहतीमधील २८ प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या वाटपाचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आले. यातील पाचजणांना अर्धा एकर जमिनीचे वाटप यापूर्वीच झाले असून, अर्धा एकर जमीन वाटपाचे आदेश गुरुवारी देण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्तांसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.