आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि.१७ : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वतीने तीन लक्ष रुपए किंमतीचे गियार्रोहण साहित्य जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते आंबोली येथील प्रशिक्षीत युवकांना वितरीत करण्यात आले.जिल्हाधिकारी दालनाच्या शेजारील सभागृहात आयोजित समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, माऊंटेनियरींग ग्रुप कोल्हापूरचे नितीन ऐनापुरे, आपत्ती निवारण कक्षाच्या राजश्री सामंत तसेच आंबोलीतील गियार्रोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक उपस्थित होते.आंबोली परिसरात पर्यटकांची वर्दळ असते. या परिसरात खोल द-या आहेत. आंबोली घाटातील वाहनांचे अपघात, पर्यटक घसरून दरीत कोसळणे अशा आपत्कालीन परिस्थितीत हे प्रशिक्षीत युवक वितरीत केलेल्या साहित्याचे सहाय्याने बचावकार्य करू शकतात. तसेच अपघात प्रसंगी दरीतून मृतदेह बाहेर काढणे आदी प्रकारची मदत करू शकतात.
आंबोलीत येथील तीस युवकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना आज विविध प्रकारचे रोप, स्ट्रेचर, हेल्मेट, असेंडर, डिसेंडर, कॅराबीनट, बिले रोप, फूल बॉडी हारनेस, सिंगल पूली, डबल पूली असे सुमारे एकवीस प्रकारचे साहित्य आज आंबोली टीमकडे सुपूर्द करण्यात आले.आंबोली टीमचे प्रमुख संतोष पालयेकर, आबा नार्वेकर, संतोष गावडे, राजन माळकर, विराज परब, अमोल नाईक यावेळी उपस्थित होते.