डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढीचा उद्देश
विनायक शिंपुकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतक-यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी 'मिनीकिट' कार्यक्रम सुरू केला आहे. ही मिनीकिट राष्ट्रीय संस्थांकडून पुरविली जात असून केंद्र सरकार राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून वित्तपुरवठा करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील जवळपास ९५ शेतक-यांना 'मिनीकिट' चे वाटप करण्यात आले आहे.
शेतक-यांना या योजनेंतर्गत विनामूल्य बियाणे देण्यात आली आहेत. कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते मिनीकिट या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शेतक-यांना यापूर्वी केंद्र सरकारच्यावतीने डाळी याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तूर, मूग आणि उडदाचे बियाणे मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, सन २०१४ व २०१५ पासून तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत आता सोयाबीन आणि भुईमूग याचे बियाणे मोफत दिले जात आहेत.
केंद्र सरकारने खरीप परिषद आयोजित केली होती.
यामध्ये सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी योजना आखण्यात आली. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकरी आत्मनिर्भर होण्याकरता सोयाबीन आणि भुईमुगाचे बियाणे शेतक-यांना मोफत देण्यासंदर्भात घोषणा केली. खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेतक-यांना बियाणे मिळावीत, यासाठी आजतागायत ५० किट वाटप केले असून, जूनअखेरपर्यंत विनाशुल्क ९५ मिनीकिट वाटप केले जाणार आहेत.
तालुक्यात तीन कृषी विभाग
हातकणंगले तालुक्यात वडगाव, हुपरी व हातकणंगले या तीन विभागांच्या माध्यमातून मिनीकिटचे वाटप केले आहे. यामध्ये वडगाव ४०, हुपरी ३० तर हातकणंगले २५ मिनीकिटचे वाटप पेरणीच्या क्षेत्रानुसार करण्यात आले आहे. प्रत्येक मिनीकिटमध्ये २० किलोग्रॅम बियाणांचा समावेश आहे.
बहुआयामी धोरण
तेलबिया व पामतेलवरील राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने खाद्यतेलाची आवश्यकता वाढवणे आणि तेलबिया व पामतेलाचे उत्पादन व उत्पादकता वाढवून खाद्यतेलाची आयात कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी बहुआयामी धोरण अवलंबिले जात आहे.
प्रतिक्रिया
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशनच्या माध्यमातून शेतकºयांना मिनीकिट दिले जात आहे. सरकारने तेल बियाणांवर अधिक भर दिले असून, त्याद्वारे जनजागृतीचे काम सुरू आहे. त्यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मिनीकिटमध्ये उच्च प्रतीचे बियाणे समाविष्ट केले आहेत. यंदा पाऊस चांगल्याप्रकारे झाल्यामुळे व प्रेरणीस अनुकूल असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी.