समीर देशपांडेकोल्हापूर : देशभरासह महाराष्ट्रातच एकूणच आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी फारच कमी खर्च होत असल्याचे दिसून येत होते. मात्र कोरोनानंतर यामध्ये बदल करावा लागला आणि आता या क्षेत्रावरील खर्च वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना त्यांच्या आजारावर होणारा खर्च सुसह्य व्हावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना २०१२ साली सुरू करण्यात आली. गेल्या दहा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ५३८ जणांच्या आजारावर मोफत उपचार करण्यात आले असून यापोटी सरकारी, खासगी रूग्णालयांना तब्बल ७२६ कोटी १३ लाख रूपये अदा करण्यात आले आहेत. म्हणूनच ही योजना सर्वसामान्यांसाठी आधार ठरली आहे.
२०१२ साली ही योजना सुरू झाली तेव्हा रेशन कार्डधारकांना दीड लाख रूपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जात होते. २०१८ पासून केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रितपणे फुले योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी केंद्र शासनाने २०११ साली झालेल्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण यादीचा आधार घेतला आणि त्यातील नागरिकांना आयुष्मान मधून साडेतीन लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने २०१८ पासून पाच लाखांचे उपचार मोफत होऊ लागले.या यादीपासून अनेकजण वंचित असल्याने अशांना केवळ दीड लाखाचा फायदा होत होता. त्यांना त्यावरील पैसे खिशातून भरावे लागत होते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जुलै २०२३ रोजी आदेश काढून या उर्वरित नागरिकांनाही पाच लाख रूपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता या यादीत नसलेल्यांचा समावेश करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अंत्योदय, पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांची ऑनलाइन माहिती भरली जात आहे.याच पद्धतीने कॅन्सर, ह्दय शस्त्रक्रिया, डायलेसिस उपचारासाठी ज्या लाभार्थ्यांनी दीड लाखांची मर्यादा ओलांडली आहे त्यांना नव्या निर्णयानुसार साडेतीन लाखांचा फायदा देण्यास सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यातील ६५ रूग्णालयांचा समावेशसध्या जिल्ह्यातील ६५ रूग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. यामध्ये ५६ खासगी रूग्णालये असून ९ शासकीय आहेत. २०१२ पासून सहा खासगी रूग्णालये यातून बाहेर पडली आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त रूग्णांकडून पैसे घेतल्याबद्दल ही काही रूग्णालयांवर याआधी कारवाई करण्यात आली आहे.
१२०९ आजारांचा समावेशज्यावेळी ही योजना सुरू झाली तेव्हा खूपच मर्यादित आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. परंतु आता तब्बल १२०९ आजारांवर यातून उपचार करण्यात येतात. आता यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून पांढऱ्या रेशनकार्डधारकांना लाभ देणे, योजनेतील रूग्णालयांची संख्या वाढवणे यावर शासनाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.