कोल्हापूर : स्वत:च्या जन्मदिनी वायफळ खर्च न करता, महानगरपालिकेच्या शाळेतील पूरबाधित ३२० शालेय विद्यार्थ्यांना भरलेले दप्तर देण्याचे संकल्प अजित ठाणेकर यांनी केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप करण्यात आली असून, उर्वरित २२० विद्यार्थ्यांना येत्या आठवड्यात पोहोचतील. यामध्ये दप्तर, वह्या, कंपास बॉक्स, आदी साहित्य देण्यात येत आहे.नगरसेवक ठाणेकर यांना श्री करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ व त्यांच्या मित्र परिवाराने मोठी साथ दिली. दप्तर वाटपाचा पहिला कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पार पडला. त्यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, नगरसेविका कविता माने, वैभव माने, माधव मुनीश्वर, मुख्याध्यापिका खानोलकर उपस्थित होते.दुसरा कार्यक्रम महापालिका न्यू पॅलेस शाळा येथे झाला. त्यावेळी भाजपाचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, विश्वजित जाधव, रणजित झेंडे, नगरसेवक राजाराम गायकवाड उपस्थित होते.महेश जाधव, विजय सूर्यवंशी यांनी ठाणेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक करून ते खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकरांचा विद्या दानाचा वसा पुढे चालवित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साताप्पा पाटील यांनी, तर आभार मुख्याध्यापिका विमल जाधव यांनी मानले.