कोल्हापूर : प्लास्टिकमुक्त रंकाळ्यासाठी शनिवारी (दि. २३) रंकाळा तलाव परिसरातील नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. एक हजार पिशव्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. ‘एक हात मैत्रीचा’ या सामाजिक संस्था आणि सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशाला यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
‘एक हात मैत्रीचा’ या संस्थेने ‘प्लास्टिक कचरामुक्त शहर व जनजागृती अभियान’ सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून रंकाळा तलाव प्लास्टिकमुक्त करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता जुना वाशी नाका येथील रंकाळा शाहू स्मृती उद्यान येथे वृक्षांना पाणी घालून उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी आदर्श प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एक हजार कागदी पिशव्यांचे वाटप रंकाळा तलाव परिसरातील शिवाजी पेठ, राजाराम चौक आणि टिंबर मार्केट परिसरातील नागरिकांना करण्यात आल्या. यावेळी अशोक चौगुले, जयश्री चव्हाण, धनराज चव्हाण, रमेश देशपांडे, मदनमोहन मुळे, उमेश यादव, दीपक येलुगडे, डॉ. संजय उपाध्ये, प्रवीण पाटील, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
रंकाळा परिसरात संस्थेच्या वतीने तसेच महापालिका आणि लोकसहभागातून ४५० वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. हे वृक्ष जगणे आवश्यक असल्याने संस्थेच्या वतीने या वृक्षांना पाणी घालण्यात आले. तसेच हा परिसर प्रदूषणमुक्त होणे आवश्यक आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळतात. परिसरातील नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर केल्यास प्रदूषणाला आळा बसणार आहे. या उद्देशाने परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.- ‘एक हात मैत्रीचा’ गु्रपचे अध्यक्ष राजेश कोगनूळकर