लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : रासायनिक कीडनाशक व खतांच्या असंतुलित व बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पाेहोचत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देऊन पर्यावरण सुरक्षा सुधारली पाहिजे. कमी खर्चात भरघोस व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन सातारा येथील सेंद्रिय शेतीतज्ञ विजय सुर्वे यांनी केले. बेलेवाडी मासा (ता.कागल) येथे आयोजित सेंद्रिय शेती कार्यशाळेत बोलत होते.
सुर्वे म्हणाले, रसायनांच्या अतिवापराने जमिनीचा दर्जा खालावतो. मनुष्याला जसे ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचेसुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. आज शेतीत वापरल्या जाणाऱ्या कृषी रसायनांमुळे पर्यावरण हानी व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे जमिनीच्या गुणवत्तेविषयी शेतकरी जागरुक होत आहेत.
यावेळी कल्पना पवार, निर्मला माने, माधुरी माळवी, नितीन माळवी, वंदना माने आदींसह सेनापती कापशी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
२२१२०२०२-कोल-बेलेवाडी कार्यक्रम
कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतीतज्ञ विजय सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कल्पना पवार, निर्मला माने, वंदना माने आदींसह शेतकरी उपस्थित होते.