कोल्हापूर : केंद्र सरकारने शेतीविषयक तीन विधेयके मंजूर केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी साखर वाटप करून आनंद व्यक्त केला. शिये (ता. करवीर) येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत आनंदोत्सव साजरा केला.गेली अनेक वर्षे शेतकरी बाजार समित्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या जोखडात आडखला आहे. त्याचे शोषण सुरू असून, यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण तीन विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतले. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची असून आता शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतीमाल विक्री करण्याची मुभा मिळणार असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे प्रमुख उत्तम पाटील, शिवसेना शाखाप्रमुख उत्तम पाटील, अण्णा पाटील, धनाजी चौगुले, के. बी. खुटाळे, बाबासाहेब गोसावी, एकनाथ उगले, सतीश चौगुले, बाजीराव पाटील, आदी उपस्थित होते.
किसान सभेच्या वतीने नव्या अध्यादेशाची होळी
कोल्हापूर : केंद्र सरकारने कामगार, शेतकरी, शेतमजुरांची दैन्यावस्था केली आहे. नवनवे अध्यादेश काढून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली असून, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन विधेयके मंजूर केली आहेत. या विधेयकांची शुक्रवारी (दि. २५) प्रत्येक तालुक्यात होळी करून भाजप सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उदय नारकर यांनी दिली.
केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी भूमिकेबाबत ‘सीटू’, किसान सभा व लाल बावटा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये केंद्रांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त करत शुक्रवारी विधेयकांची होळी करण्याचा निर्णय झाला.
बैठकीला प्राचार्य ए. बी. पाटील, प्रा. सुभाष जाधव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, प्रा. आबासाहेब चौगले, अमोल नाईक, विकास पाटील, अरूण मांजरे, सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, आदी उपस्थित होते.