कोल्हापूर : महानगरपालिकेचे शववाहिका चालक दिवस-रात्र, कोविड व नॉन कोविड सेवा देत आहेत. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आजरेकर फौंडेशनतर्फे दोन हजार पाण्याच्या बाटल्या अग्निशमन विभागाकडे देण्यात आल्या.
दोन दिवसांपूर्वी रविवार पेठेत एक मृतदेह नेण्यासाठी शववाहिका आली असताना, चालक तहानलेला होता. पाण्यासाठी त्याने शववाहिका रस्त्याशेजारी लावून एका घरातून पाणी घेतले. ही गोष्ट गणी आजरेकर यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच नियोजन करून शिवजयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिकेच्या शववाहिका चालकांसाठी दोन हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
तसेच संभाजी ब्रिगेड कोविड केअर सेंटर, गिरगावला तांदूळ, चटणी व भाजीपाला देण्यात आला. या उपक्रमासाठी उद्योगपती गिरीश शाह, उद्योगपती दादा शेख चटणी वाले, मार्केट यार्डमधील बाबूराव कांदेकर, सहीर बागवान , इर्शाद बागवान व आजरेकर फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले. यावेळी अश्किन आजरेकर, शौकत बागवान, विशाल शिंदे, किरण नरके, विकी पंडत, अक्षय भुजुगडे व अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.