कोल्हापूर : ज्या खात्यावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही अशा व मालकी हक्क न सांगितलेल्या खात्यातील रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करण्याचे आदेश आल्याने बँका चांगल्याच धास्तावल्या आहेत.जिल्ह्यातून १५ कोटी रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे वर्ग करावी लागणार आहे. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित खातेदारांनी पैसे परत मागितले तर त्याला बँकेच्या स्वभांडवलातून द्यावे लागणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण आणले. दहा वर्षे व्यवहार न झालेल्या खात्यावरील रकमा ‘ठेवीदार जागरूकता शिक्षण निधी’साठी वर्ग करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रात ठेवीदार हा महत्त्वाचा घटक आहे. ठेवी हा कच्चा माल असून त्यावरच कर्जाचे वाटप केले जाते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात ठेवीदाराला संरक्षण मिळावे, यासाठी ठेवीदार जागरूकता शिक्षणाचा कार्यक्रम रिझर्व्ह बँकेने हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून दहा वर्षे व्यवहार नसलेल्या खात्यावरील रकमा या निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे अशा रकमा मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक संस्थांमधून ठेवी तशाच पडून आहेत, बचत खात्यावरील चारशे-पाचशे रुपयांच्या रकमा तर मोठ्या प्रमाणात आहेत. या रकमा रिझर्व्ह बँकेकडे वर्ग कराव्या लागणार आहेत. त्यानंतर संबंधित ठेवीदार अथवा खातेदारांने पैशांची मागणी केली तर बँकेने स्वनिधीतून हे पैसे द्यायचे. एकतर या रकमा बँकांकडे पडून असल्याने त्याचा फायदा बँकांना व्हायचा, तो कमी झालाच पण त्याबरोबर मागणी करणाऱ्या ठेवीदारांना पैसे द्यावे लागणार असल्याने बँका धास्तावल्या आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १५ कोटी जाणार रिझर्व्ह बँकेत
By admin | Published: June 24, 2014 1:12 AM