कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील ३८६ ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवारी मतदान होत आहे. त्यासाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, मतदानाची शाई असे साहित्य घेऊन गुरुवारी कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होईल.
त्यासाठी गुरुवारी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य देण्यात आले. तत्पूर्वी ईव्हीएम मशीन हाताळणी व मतदानप्रक्रिया कशी पार पाडावी याचे अखेरचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी साहित्य घेऊन केंद्राच्या ठिकाणी रवाना झाले. जिल्ह्यात शिरोळ, कागल व गडहिंग्लज या तीन तालुक्यांसाठी संपूर्ण आचारसंहिता असून, सर्वच तालुक्यांमध्ये आचारसंहितेचे योग्य पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता, सोशल मीडिया व पेड न्यूज समिती नियुक्त करण्यात आली आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ६३ पथके कार्यरत असणार आहेत.
निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसात उमेदवारांनी खर्च सादर करायचा असून, त्यासाठी १२ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी वोटर ॲपची सुविधा उपलब्ध आहे, तर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक साहित्य व कीट पुरवण्यात आले आहे.
--
फोटो फाईल स्वतंत्र ग्रामपंचायत फाेटो या नावाने पाठवली आहे.