कोल्हापूर : मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ हा पुरस्कार मिळाला असून, नवी दिल्ली येथे उद्या, शनिवारी हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. स्विप कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील बहुमान प्राप्त झाल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करून जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केल्याची ही पावती असल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी म्हटले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्विप (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) ही मोहीम गेली दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. सुरुवातीपासूनच मतदार नोंदणीतील कच्चे दुवे शोधून महिला व युवा मतदारांना मतदार यादीत नाव नोंद करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नोंदणी झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांनी मतदान केले. यामुळे व्होटर्स टर्न आउटमध्ये जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला, असे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी स्पष्ट केले.३१ जुलै २०१४ च्या यादीनुसार जिल्ह्यात २९०५५५३ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत स्कॉच अवॉर्ड फॉर एक्सलन्स स्पर्धेमध्ये ‘सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. स्कॉच निवड समितीकडून या नामांकनास ‘द बेस्ट प्रोजेक्ट इन द कंट्री’ म्हणून गौरविण्यात आले आहे. या प्रकल्पाला ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ बहुमान प्राप्त झाला आहे. ही बाब जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची आहे, याबाबत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनास आज ‘स्कॉच’ पुरस्कार वितरण
By admin | Published: September 19, 2014 11:57 PM