कोल्हापूर : दीर व भावजय यांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू भोकसून त्याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.२) बी. डी. शेळके यांनी शनिवारी एकास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.प्रसन्न उर्फ बाळू उर्फ बळी सज्जन साठे (वय ४९ रा. मातंग वसाहत, राजारामपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. २१ एप्रिल २०१८ रोजी मांतंग वसाहतीत झालेल्या घटनेत संदीप सखाराम बेरड (वय ३५, रा. राजारामपुरी ५ वी गल्ली) याचा खून केला होता. खटल्यात, सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले.याबाबत माहिती अशी की, दि. २१ एप्रिल २०१८ रोजी राजारामपुरी मातंग वसाहतीत आरोपी प्रसन्न उर्फ बळी साठे व त्याची भावजय मंगल साठे यांच्यात घरी भांडण सुरू होते. त्याच गल्लीत राहणारा संदीप बेरड हा त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी रागातच आरोपी प्रसन्न साठे याने संदीपच्या पोटात चाकूने भोसकले यात तो मृत झाला.सागर बाजीराव अवघडे याच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. राजारामपुरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी गुन्ह्याचा तपास केला. पुढील तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्यास, सरकारतर्फे १७ साक्षीदार तपासले. त्यापैकी घटनास्थळीवरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मंगल साठे व अश्विनी साठे ह्या फितूर झाल्या. तथापि, अन्य साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावा, वैज्ञानिक प्रयोगशाळेचा पुरावा, वैद्यकीय अधिकारी यांचा पुरावा तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अमित महाडेश्वर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश शेळके यांनी आरोपी प्रसन्न उर्फ बाळू उर्फ बळी सज्जन साठे याला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ॲड. महाडेश्वर यांना न्यायालयीन कामकाजात ॲड. गजानन कोरे, ॲड. प्रशांत कांबळे यांनी तसेच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलीस नाईक अशोक शिंगे यांनी सहाय केले.
खूनप्रकरणी एकास जन्मठेप, भांडणे सोडविण्यासाठी आला अन् जिवास मुकला; राजारामपुरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 5:48 PM