लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारुप यादी ३ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, १३ सप्टेंबरपर्यंत या यादीवर हरकती घेता येणार आहेत. हरकतींवर सुनावणी घेऊन २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा बँकेसाठी संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव गोळा केले आहेत. बँकेच्या पोटनियमानुसार त्यांची छाननी करण्याचे काम बँकेच्या पातळीवर सुरु आहे. बँकेनेही ही यादी मंगळवार (दि. १७)पर्यंत जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरला प्रारुप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारुप यादीवर हरकतीची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत आहे. तसेच आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दहा दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. साधारणत: ८ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊ शकते.