वारणानगर : जिल्हा बॅँकेसह गोकुळ दूध संघ व अन्य संस्थांच्या निवडणुका ‘जनसुराज्यशक्ती’च्या माध्यमातून ताकदीने लढविण्याचे संकेत मंगळवारी रात्री झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जनसुराज्य पक्षाने संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी दिले. वारणानगर येथे जिल्हा बॅँक, गोकुळ दूध संघ व अन्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील सेवा संस्था, दूध संस्था व कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात माजी मंत्री विनय कोरे बोलत होते. प्रारंभी जनसुराज्यशक्ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले.कोरे यांनी मागील पंचवार्षिक जिल्हा बॅँकेसह गोकुळ दूध संघ, मार्केट कमिटी आदी संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्षाला अनेक आव्हाने तसेच संघर्ष करावा लागला. कार्यकर्ते व जनतेच्या पाठबळावर या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती संघटनेने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मुसंडी मारली. पन्हाळ्यात संघटना अभेद्य राहावी यासाठी कार्यकर्त्यांना यापुढेही बरोबर घेऊनच संघटनेची ताकद पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये साथ देण्याचे आवाहन कोरे यांनी केले.यावेळी अॅड. महादेव चावरे, विकास पाटील, शिवाजीराव मोरे, भीमराव पाटील, भरत मोरे, ज्ञानेश्वर गिरवे, अण्णा चौगुले, यांच्यासह अन्य संस्था प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी भाषणे केली. यावेळी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने मोठ्या ताकदीने उतरावे, अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ नेते भगवान सरनोबत, प्रमोद कोरे, सर्जेराव पाटील, एच. आर. जाधव, प्रकाश पाटील, विष्णू बच्चे, रवींद्र जाधव, परशुराम खुडे, बाळासाहेब जाधव, बी. एम. पाटील, संजय दळवी, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
जिल्हा बँक, गोकुळ स्वबळावर
By admin | Published: January 28, 2015 11:18 PM