लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या आयकर विभागाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव केला. बँकेने कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
, "आजादी का अमृत महोत्सव" या अभियानांतर्गत जिल्हा बँकेला सन २०२० -२१ सालातील सर्वसाधारण विभागातील द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. अर्थात, बिगर कंपनी विभागातील हे प्रथम पारितोषिक आहे. पुणे विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त श्रीमती छवी अनुपम व कोल्हापूर विभागाचे सहआयुक्त डी. के. महाजन यांच्या हस्ते बँकेचे तज्ज्ञ संचालक असिफ फरास व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी पुरस्कार स्वीकारला.
अनुपम म्हणाल्या की, प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या संस्थांचा गौरव केला जात असून, जिल्हा बँकेला १४५ कोटी ढोबळ नफा होऊन, त्यातून १८ कोटी २२ लाखांचा आयकर भरला आहे. सहआयुक्त डी. के. महाजन म्हणाले की, जिल्हा बँकेने जास्तीत जास्त आयकर भरून देश उभारणीला हातभार लावला आहे. बँकेने ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी व राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे. बँकेचे संचालक असिफ फरास म्हणाले की, हा गौरव जिल्ह्यातील २ लाख ९० हजार शेतकरी व अकरा हजार संलग्न संस्थांचा आहे. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत जाईल.
संचित तोटा भरुन बँक नफ्यात
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली २०१५ ला संचालक मंडळ आल्यानंतर काटकसरीचा कारभार करत १०३ कोटीचा संचीत तोटा भरुन काढला. दुसऱ्या वर्षापासून बँक नफ्यात आली आणि आयकर भरण्यास सुरुवात केली. सध्या बँक सक्षम असून, यासाठी बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक, शेतकरी, संस्था, सभासद, ग्राहक व कर्मचाऱ्यांचे योगदान खूप मोठे असल्याचे डॉ. ए. बी. माने यांनी सांगितले.
फोटो ओळी : आयकर विभागाकडून कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी विभागात सर्वाधिक आयकर भरल्याबद्दल जिल्हा बँकेचा गौरव केला. आयकर विभागाचे सह आयुक्त डी. के. महाजन यांच्या हस्ते बँकेचे संचालक असिफ फरास व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी पुरस्कार स्वीकारला. (फोटो-२८०८२०२१-कोल- जिल्हा बँक)