कोल्हापूर : सोयी, सुविधांच्या पातळीवर शहर व ग्रामीण जीवनात मोठा फरक असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बॅँकेने शहरातील सुविधा गावात दिल्याने दोन्ही जीवनशैलीतील दरी कमी करण्यात यश आल्याचे गौरवोद्दगार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले.
जिल्हा बॅँकेच्या मोबाईल बॅँकींग व अद्ययावत वेबसाईटचा प्रारंभ डॉ. थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रामुख्याने शेतकरीच ग्राहक असलेल्या या बँकेने तंत्रज्ञानात गरुडभरारी घेतली आहे. आजघडीला अडीच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार किसान क्रेडिट कार्डचा वापर करीत आहेत. येत्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्हा बॅँक देशातील सर्वोत्कृष्ट बँक होईल. नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणाचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅँकांना बसला. यातून बाहेर पडत प्रगतीचा हा टप्पा गाठला.मुश्रीफ यांनी शब्द पाळला!तीन वर्षापुर्वी किसान क्रेडीट कार्डच्या वितरणास प्रमुख पाहुणा म्हणून आपण आलो होतो. त्यावेळी बॅँक नफ्यात आणू मगच तुम्हाला बॅँकेत बोलवू, असा शब्द दिला होता. आज बॅँकेची प्रगती पाहता त्यांनी शब्द खरा केला असून बॅँकेने आर्थिक निकष तर पार केलेच आता सामाजिक निकष पुर्ण करावेत, असे डॉ. थोरात यांनी सांगितले.सहकारच गरिबांचा वाली.....डॉ यशवंतराव थोरात म्हणाले, सहकारात घुसलेल्या अपप्रवृत्तीमुळे सहकारच रद्द करावा असा सल्ला मी वैद्यनाथन यांना दिला होता. त्यावेळेस त्यांनी मला तीन महिने सुट्टी घेऊन भारत फिरून मग अभ्यासानंतर म्हणणे देण्याचा सल्ला दिला. तीन महिन्याच्या देश फिरून केलेल्या अभ्यासानंतर मी त्यांना म्हणालो सहकार रद्द करावा वाटण्याजोगी कारणे अनेक आहेत. परंतु, फक्त एकच कारण असे आहे की सहकार टिकला पाहिजे. ते म्हणजे सहकाराशिवाय गोरगरीब शेतक?्याला कुणीच वाली नाही.यावेळी संचालक मंडळातील खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, आर. के.पोवार, अनिल पाटील, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने , आसिफ फरास यांच्यासह नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक आदी प्रमुख उपस्थित होतेप्रास्ताविकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी . माने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी मोबाईल बँकिंग व अद्ययावत वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी केले. आभार संचालक अनिल पाटील यांनी मानले .