लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज, सोमवारी ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. प्रशासक काळातील १०३ कोटींचा संचित तोटा कमी करून बँकेने दीडशे कोटीच्या ढोबळ नफ्याच्या यशस्वी टप्प्यावर आहे. बँकेचे गेल्या आर्थिक वर्षात बँक कर्मचारी, गटसचिवांसह शेतकऱ्यांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. त्यामुळे बँकेचा संयुक्त व्यवसाय १२ हजार ८०० कोटींहून अधिक झाला आहे.
बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाइन सभा होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात किसान साहाय्य योजनेअंतर्गत हेक्टरी बागायती क्षेत्रासाठी २ लाखांवरून अडीच लाख, तर जिरायतसाठी १ लाखावरून दीड लाख अशी कर्जमर्यादेत वाढ केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बँकेतच ७/१२, ८ अ व गाव नमुना उतारे बँकेतच मिळण्याची सोय केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा सहा लाखांवरून सात लाख इतकी केली. विकास सेवा संस्था सक्षमीकरण योजनेअंतर्गत संस्थांना साडेपाच कोटींचे अनुदानाचे वितरणही केले आहे. शेतकऱ्यांना विकास व दूध संस्थांच्या माध्यमातून म्हैस खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
दृष्टिक्षेपात बँकेची प्रगती...
संयुक्त व्यवसाय १२ हजार ८०० कोटींहून अधिक.
कोल्हापूर परिक्षेत्रात बिगर कंपनी विभागात जास्तीत जास्त इन्कम टॅक्स भरणारी बँक म्हणून गौरव
शाखा नसलेल्या व डोंगर कपारीतील वाड्या-वस्त्यांवर ५०० मायक्रो एटीएम सेंटर्स.
खातेदार असलेल्या नोकरदार पगारदारांना ३० लाख रुपयांची विमासुरक्षा.
मार्च २०२१ अखेर ७ हजार, १४१ कोटींच्या ठेवी.
वसूल भागभांडवल २२६ कोटींवर.
नेटवर्थ ४७० कोटींवर
स्वमालकीची कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित केली आहे.
मोबाइल बँकिंग व इतर अद्ययावत सुविधा सुरू.