कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक आपले भागभांडवल वाढविणार आहे. यासाठी एका शेअर्सची (भाग) रक्कम एक हजारावरुन दहा हजार रुपये केली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी बॅँकेला अधिकृत भागभांडवल दोनशेवरून तीनशे कोटी करावे लागणार आहे. यामुळे संचालक मंडळाने बॅँकेचे अधिकृत भागभांडवल वाढीसाठी पोटनियम दुरुस्तीचा विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.जिल्हा बॅँकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबरला दुपारी एक वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे होत आहे. सभेपुढे पारंपरिक विषयांबरोबर भाग भांडवल पोटनियम दुरुस्तीचा विषय ठेवला आहे. संचालक मंडळाच्या सभेत सभासद भाग भांडवल वाढीबाबत चर्चा झाली. गेली अनेक वर्षे बॅँकेच्या शेअर्सची रक्कम एक हजार रुपये आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. शेअर्स रक्कम एक हजारावरून दहा हजार रुपये करायची आहे; पण शेअर्स भांडवल वाढवायचे झाल्यास बॅँकेच्या अधिकृत भाग भांडवलाची मर्यादा वाढवावी लागणार आहे. जिल्हा बॅँकेची अधिकृत भाग भांडवल मर्यादा दोनशे कोटी आहे. सध्या बॅँकेकडे सुमारे १७६ कोटी भाग भांडवल आहे. त्यामध्ये वाढ करून ते तीनशे कोटी केले जाणार आहे. तसा विषय पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला आहे. त्याला मंजुरी मिळताच शेअर्सची वाढ केली जाणार आहे. सध्याबॅँकेची शेअरच्या किंमतही वाढविली जाईल.दरम्यान, बॅँकेच्या व्यक्ती सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ सप्टेंबर त्याच ठिकाणी दुपारी बारा वाजता आयोजित केली आहे.२५०० सभासदांचे भागभांडवल ५०, १०० रुपयेबॅँकेशी संलग्न सुमारे अडीच हजार संस्था व व्यक्ती सभासदांचे भागभांडवल ५० व १०० रुपये असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातील बऱ्यापैकी संस्था अडचणीतील असल्याने त्यांच्याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोल्हापूर जिल्हा बॅँक अधिकृत भागभांडवल वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:35 AM